Fri, Jun 05, 2020 18:57होमपेज › Nashik › भाजप आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार

भाजप आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार

Published On: Jan 05 2019 8:44PM | Last Updated: Jan 05 2019 8:44PM
धुळे : प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशात अनेक पक्ष एकत्र येत असले तरीही आगामी निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्द्यावर लढवून जिंकणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याची माहिती देतानाच आमदार अनिल गोटे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.

धुळ्यात केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे मंत्री जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थित होते. 

राज्यातील ३६ लोकसभा मतदार संघात आपला दौरा झाला असून यात बुथनिहाय कामांची माहिती घेण्यात आली. पक्षाने ठरवून दिलेले काम चांगल्या पध्दतीने सुरु असून याच नियोजनबध्द कामाचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार आहे. देशभरात भाजपाच्या विरोधात अनेक पक्षांची आघाडी होत आहे. पण भाजपा ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवून जिंकणार आहे. राज्यात समविचारी पक्षाच्या मतांमधे विभाजन होवू नये, असा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपाच्या सोबत यावे असा प्रयत्न आहे, असे दानवे म्हणाले.

राज्यात भाजपाकडून कुणालाही उमेदवारी जाहीर नाही : दानवे

राज्यात अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. आतापर्यंत मला तसेच मंचावर बसलेल्या कुणासही उमेदवारी बाबत माहिती नाही. भाजपामधे उमेदवारी देण्याची पध्दत ठरलेली असून केंद्रीय पातळीवरुनच हा निर्णय होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार गोटेंवर कारवाई नाही

धुळयाचे आमदार अनिल गोटे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच निवडणुकीत राजकीय विधाने केली जातात. याच काळात आपण कुणी आडवे आल्यास त्याला आडवे करण्याचे वाक्य वापरले होते. पण हे वाक्य राजकीय असल्याने निकालात त्याचा प्रत्यय आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

आगामी निवडणूक हिंदुत्वाच्या प्रश्नावर होणार किंवा कसे या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. देशात भाजपाची अनेक पक्षांबरोबर युती असून किमान समान प्रश्नांवर ही युती असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नाला बगल दिली.