Tue, Nov 19, 2019 14:09होमपेज › Nashik › नाट्यगृहाच्या भूमिपूजनावरून भाजपामध्ये मानापमान नाट्य 

नाट्यगृहाच्या भूमिपूजनावरून भाजपामध्ये मानापमान नाट्य 

Published On: Aug 27 2019 1:49AM | Last Updated: Aug 26 2019 11:01PM
नाशिक : प्रतिनिधी

पंचवटीत नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप यांनी महापौर वगळता मनपाच्या अन्य एकाही पदाधिकार्‍याला आमंत्रित केले नाही. यामुळे पदाधिकार्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधक सोडाच परंतु, सत्ताधारी भाजपामधीलच पदाधिकार्‍यांना वगळल्याने भाजपातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

विधानसभा निवडणुकांमुळे सध्या बरेच राजकीय वादळ उठत आहे. उमेदवारी मिळू नये किंवा आपल्यापेक्षा इतर कोणी वरचढ ठरू नये, यासाठी राजकीय समीकरणे आणि आडाखे बांधले जात आहेत. निवडणुका जवळ आल्याने प्रभागांसह विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे साजरे होऊ लागले आहेत. इच्छुकांकडून आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याच कारणावरून पक्षामध्ये आणि पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये स्पर्धा वाढीस लागली आहे. पंचवटीत सोमवारी (दि.26) नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघात हे काम असले तरी त्यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला जाणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी संयोजकांनी महापौर रंजना भानसी वगळता अन्य कुणालाही आमंत्रित केले नाही. यामुळे गटनेते जगदीश पाटील, सभागृहनेते सतीश सोनवणे तसेच स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांच्यासह विरोधी पक्षातील पदाधिकारीही नाराज झाले आहेत. 

निमसे हे तर विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून इच्छूक आहेत. यामुळे तसेही निमसे आणि सानप यांच्यात अंतर्गत वाद सुरू होताच. त्यात आता नाट्यगृहाच्या कार्यक्रमासाठी स्थायी सभापतींनाही बोलावले नाही. यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेवरही अनेक पदाधिकार्‍यांची छायाचित्रे नसल्याचे दिसून येते. मनपाचा निधी खर्च होणार असेल तर त्यासाठी निदान मनपाच्या इतरही पदाधिकार्‍यांना आमंत्रित करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. याबाबत महापौर भानसी यांना विचारले असता याबाबत आपल्याला काहीही भाष्य करायचे नाही. महापौर या नात्याने मला उपस्थित राहणे गरजेचे वाटते. म्हणून मी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.