Wed, Jun 03, 2020 08:43होमपेज › Nashik › नाशिक : भारती पवार यांच्या विजयामुळे अनेकांना हादरा

नाशिक : भारती पवार यांच्या विजयामुळे अनेकांना हादरा

Published On: May 23 2019 6:33PM | Last Updated: May 24 2019 2:28AM
नाशिक : प्रतिनिधी

खुद्द शरद पवार यांनी लक्ष घालूनही दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे. या विजयामूळे छगन भुजबळांसह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची समीकरणे बदलणार आहेत.

दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव व येवला हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबियांच्या ताब्यात आहेत. नांदगाव येथे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज, तर येवला येथे खुद्द छगन भुजबळ हे आमदार आहेत. असे असूनही या दोन्ही मतदारसंघातून डॉ. भारती पवार यांना मताधिक्य मिळाले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना, पवार यांनी मारलेली मुसंडी भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आमदार नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू किशोर दराडे यांनी बाजी मारल्याने भुजबळ यांना आव्हान निर्माण झाले होते. त्यातच आता भारती पवार लोकसभेत विजयी झाल्याने भुजबळ यांची आगामी राजकीय वाटचाल बिकट मानली जात आहे. दिंडोरी मतदारसंघात असलेल्या लासलगाव, निफाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भारती पवार यांच्यासाठी काम केल्याचे बोलले जात होते. हे एकप्रकारे स्वकीयांनीच आव्हान दिल्यासारखे होते. 
तर दुसरीकडे भारती पवार यांचे दिर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार हे राष्ट्रवादीकडून कळवण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण तेही धनराज महाले यांना आघाडी देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांची वाटचालही अडचणीची मानली जात आहे.

अखेर स्वप्न पूर्ण

भारती पवार यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती व त्यात त्या भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. यंदा मात्र पवार भाजपाच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. म्हणजे गेल्या वेळी ज्या पक्षाकडून त्या पराभूत झाल्या होत्या, त्याच पक्षाच्या तिकिटावर यंदा त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे चित्र आहे.