Fri, Jun 05, 2020 05:45होमपेज › Nashik › काँग्रेसच्या काळातील चुका भाजपाने सुधारल्या : रामदास आठवले 

काँग्रेसच्या काळातील चुका भाजपाने सुधारल्या : रामदास आठवले 

Published On: Aug 31 2019 1:30AM | Last Updated: Aug 30 2019 11:06PM
पंचवटी : वार्ताहर 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वांत आधीपासून आपण प्रयत्नशील होतो. भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने हा समाज समाधानी असून, काँग्रेस सरकारच्या काळातील झालेल्या चुका सुधारण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

छावा मराठा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा व सन्मान सोहळा शुक्रवारी (दि.30) हनुमानवाडी येथे झाला. त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लढणार्‍या राज्यातील 55 जणांचा मराठा समाजरत्न आणि मराठा समाज मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

भारतरत्न मिळावा यासाठी अनेकांची नावे पुढे येत असतात, मात्र, मराठा समाजरत्न पुरस्कार एका दलिताला मिळावा, ही मोठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेसच्या काळातील मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काहीच केले नाही. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा मराठ्यांवर अन्याय करणारा नाही, त्यामुळे गावागावांतील दलित आणि मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे नेते म्हणून आठवले यांचे नाव घेतले जाते. सर्व समाजाला सोबत घेऊन ते चालत असून, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने मराठा समाज त्यांचा ऋणी असल्याचे छावाचे प्रदेशाध्यक्ष पांगारकर म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या योगदान दिले त्यांचा मराठा समाजरत्न आणि मराठा समाज मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात श्यामला दीक्षित, संजय साबळे, गजानन शेलार, श्रीराम शेटे, गणेश कदम, दिलीप भामरे, रशीद सय्यद, शत्रुघ्न झोंबाड, रतन अलिझाड, प्रणाली उकिरडे, राम जाधव, संभाजी पवार आदींसह एकूण 55 कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, नगरसेवक गजानन शेलार, प्रकाश लोंढे, श्रीराम शेटे आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोम्बाड, मुस्लिम आघाडीचे रशीद सय्यद,  जिल्हाध्यक्ष अमोल कोथे, योगेश देसले, योगेश शेलार यांनी प्रयत्न केले.