Wed, Jun 03, 2020 20:18होमपेज › Nashik › वादग्रस्त 37 कोटींच्या ठेक्यातून भाजपा शहराध्यक्षांची एक्झिट 

वादग्रस्त 37 कोटींच्या ठेक्यातून भाजपा शहराध्यक्षांची एक्झिट 

Published On: Aug 31 2019 1:30AM | Last Updated: Aug 30 2019 11:16PM
नाशिक : प्रतिनिधी

पेस्ट कंट्रोलच्या प्रस्तावित ठेक्याशी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचे नाव जोडले गेल्याने पक्षाची जबाबदारी म्हणून आता त्यांनी संबंधित ठेक्यात सहभाग घेणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे शहराध्यक्षांनी या ठेक्यातून एक्झिट घेतल्याने हा वादातीत ठेका कुणाला मिळतो याकडे लक्ष लागून आहे. 

गेल्या 14 ऑगस्ट रोजी 37 कोटींच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याबाबतची निविदा पूर्व बैठक आरोग्य वैद्यकीय विभागात झाली. या बैठकीला दहा ते बारा ठेकेदारांनी हजेरी लावली होती. त्या बैठकीला पालवे यांच्यासह त्यांचे बंधू उपस्थित होते. यापूर्वीही पालवे यांनी मनपाच्या पेस्ट कंट्रोलचा ठेका घेतलेला होता. तसेच घंटागाडी ठेक्याशीही त्यांचा संबंध असल्याचे बोलले जाते. मात्र, निविदा पूर्व बैठकीला पालवे यांची हजेरी असली तरी या बैठकीनंतर त्यांच्याकडे भाजपाच्या शहराध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा हाती आली. मात्र, पेस्ट कंट्रोलसह अन्यही ठेक्यांशी त्यांचे संबंध जोडले जात असल्याने आता त्यांनी पदावर असेपर्यंत ठेक्यात सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट केेले आहे. आगामी निवडणुका पाहता महाालिकेच्या कुठल्याही कामकाजात सहभाग नको म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. तसेच वरिष्ठांकडूनही त्यांना तशा प्रकारच्या सूचना केल्याची चर्चा आहे. 

पेस्ट कंट्रोलचा ठेका तीन वर्षांसाठी असून, त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. मागील तीन वर्षांसाठी हा ठेका 17 कोटींना होता तर आता तीन वर्षांसाठीच हा ठेका तब्बल 37 कोटींना जाणार आहे. तीन वर्षांत ठेक्याची किंमत थेट 20 कोटींनी वाढल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. त्यावर मनपाच्या लेखापरीक्षण विभागानेदेखील आक्षेप घेत एवढी रक्‍कम वाढण्याचे कारण काय अशी विचारणा केली होती. त्यावर आरोग्य विभागाने सुमारे सव्वाशे कर्मचार्‍यांची वाढती संख्या आणि किमान वेतनाचा वाढता दर ही दोन कारणे देत खुलासा सादर केला होता. त्यानुसार या दोन्ही कारणांना आधीन राहून लेखापरीक्षण विभागाने पेस्ट कंट्रोल ठेक्याला हिरवा कंदील दाखविला आहे.