Wed, Jun 03, 2020 22:36होमपेज › Nashik › विकासासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण हवे : आंबेडकर

विकासासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण हवे : आंबेडकर

Published On: Mar 22 2019 8:37PM | Last Updated: Mar 22 2019 11:44PM
जळगाव : प्रतिनिधी

विकास साधायचा असेल तर सत्ता एका विशिष्ट कुटुंबाच्या हाती नको. तसे झाले तर विरोधी पक्ष नावालाच उरतो, त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

लोकसभा निवडणुकीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर जळगाव येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, या आधी घराणेशाहीच्या उमेदवार्‍या होत्या. हे कधी लोकांच्या लक्षात आले नाही. तसेच, राजकीय पक्षांनीदेखील तसे दाखवले नाही. हीच बाब ओळखून वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत सर्वांना प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना अशी सरळ लढत होणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली तर नांदेडसारख्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवावी की त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवावी, अशी बिकट परिस्थिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचीच अशी गत असेल तर इतरांचे काय, असा प्रश्‍न अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्व्हेचा अहवाल आल्यानेच माघार घेतली. शरद पवारांनी माघार घेणे हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला परिस्थिती अनुकूल नसल्याचे संकेत असल्याची टीका केली.