Mon, Jun 01, 2020 06:29होमपेज › Nashik › बाइक रॅलीने वेधले नाशिककरांचे लक्ष

बाइक रॅलीने वेधले नाशिककरांचे लक्ष

Published On: Sep 19 2019 1:31AM | Last Updated: Sep 18 2019 10:55PM
सिडको : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पाथर्डी फाटा, सिडको येथे ढोल-ताशांच्या गजरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात  स्वागत करण्यात आले. राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये (दि.19) समारोप होणार आहे. बुधवारी(दि.18) मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा येथे दुपारी 3 पासून हजारो भाजपा कार्यकर्ते उपस्थित झाले होते. दुपारी महाजनादेश यात्रेचा रथ नाशकात दाखल झाला होता. तर मुख्यमंत्री फडणवीस मुंबई येथून दुपारी विमानाने ओझरला आले. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पाथर्डी फाटा येथे त्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर महाजनादेश यात्रेच्या रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, आ. सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. यात्रेच्या पुढे कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली होती. यावेळी उपेंद्रनगर, उत्तमनगर, सावतानगर, दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडीमार्गे शहरात दाखल झाली. 

यावेळी सिडकोतील यात्रेच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी उभे राहून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. पाथर्डी फाटा ते सिडको रस्त्यावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. पाथर्डी फाटा, पवननगर येथे क्रेनच्या सहाय्याने मुख्यमंत्री फडणवीस व उपस्थितांचे भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. 

दुपारी पाथर्डी फाटा येथे महाजनादेश यात्रेचा रथ दाखल झाल्यानंतर  पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाथर्डी फाटा येथे भेट देऊन रथाची तपासणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला होता. अंबड येथून नगरसेवक धनाजी लगड हे शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटारसायकल रॅलीने पाथर्डी फाटा येथे आले होते. रॅलीत वसंत गिते, सुनील बागूल, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, डॉ. वैभव महाले, कैलास आहिरे, प्रदीप पेशकार, मयूर अलई, दिलीपकुमार भामरे, अनिल जाधव, अलका आहिरे, दिनकर पाटील, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार आदींसह भाजपाचे शेकडो पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.