Tue, Nov 12, 2019 08:48होमपेज › Nashik › एरंडोलीत पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

एरंडोलीत पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

Published On: Feb 23 2019 3:25PM | Last Updated: Feb 23 2019 3:25PM
जळगाव : प्रतिनिधी

एरंडोलीतील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील एका पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) रात्री घडली आहे. पाच दिवसाआधी जामनेर तालुक्यातील पहूर पंपाची कॅश भरण्यासाठी जात असताना सहा लाख ४५ हजाराची लूट झाली होती. हे आरोपी सापडण्‍याआधीच एरंडोली पंपावर लूटमार झाल्‍याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. मात्र पोलिस प्रशासनावर या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बाबूलाल शहा यांचा एरंडोलपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर नवीन धारागीर गावाजवळ हायवेवर एम. जी. शहा नावाने पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी (ता.२१) रात्री पेट्रोलपंपावर रवींद्र पाटील व निलेश पाटील हे दोन कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर होते. रात्री साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांनी दोन कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून  अज्ञात आरोपींनी ऑफिसमध्ये नेले व ड्रॉव्हर उघडले त्यामधील असलेली कॅश ४७ हजारा ६०० रुपयाची रोकड लंपास केली. या अज्ञात आरोपींनी रवींद्र पाटील व निलेश पाटील याना ऑफिसमध्ये बंद करुन घटनास्थळावरून पसार झाले.  

या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. परंतु दरोडेखोर मिळून आले नाहीत. या संदर्भात एरंडोल पोलिसात पेट्रोल पंपवरील कर्मचारी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरूढ चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० ते २.४५  या सुमारास येथील अजिंठा टेंडर्स पेट्रोल पंपाचे मॅनेजर संजय पारखे हे येथील जामनेर रोडवर असलेल्या युनियन बँकेत पैसे भरण्‍यासाठी जात असताना युनियन बँकेजवळ तीन अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून सहा लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून पळून गेले. या घटनेतील आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पाच दिवसांत दुसरी लूट झाली. यावरून पोलिस प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.