Tue, Jun 02, 2020 23:21होमपेज › Nashik › शहर बसची बेल अखेर खणखणली

शहर बसची बेल अखेर खणखणली

Published On: Sep 18 2019 1:49AM | Last Updated: Sep 17 2019 10:34PM
नाशिक : प्रतिनिधी

शहर बससेवेसाठी इलेक्ट्रिक, डिझेल व सीएनजी बसेस खरेदी, त्यांचे व्यवस्थापन, संचलन आणि देखभाल करण्याकरता बस ऑपरेटरची दहा वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यास मंगळवारी (दि.17) झालेल्या स्थायी समितीने मंजुरी दिली. यामुळे आता खर्‍या अर्थाने शहर बससेवेची बेल खणखणली असून, बससेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर झाला. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी निमसे यांचे कसब खरे तर पणाला लागणार होते. परंतु, त्यांनी शिताफीने प्रस्तावाविषयी आपले म्हणणे मांडून प्रस्ताव मंजुरीवर मोहोर उमटविली. बस ऑपरेटर नेमण्यासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडून तयारी सुरू होती. निविदा प्रक्रियेद्वारे मनपाने बस ऑपरेटरसाठी निविदा मागविल्या होत्या. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने तीन ते चार वेळा फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतरही इलेक्ट्रिक तसेच डिझेल आणि सीएनजीसाठी केवळ एक-एकच निविदाधारकांची निविदा प्राप्‍त झाल्या. यामुळे प्रशासनाने या निविदा स्वीकारल्या. मात्र, संबंधित दोन्ही निविदाधारकांनी प्रतिकिमी दर अधिक सांगितल्याने त्यावर तडजोड सुरू होती. वाटाघाटीअंती  सबसिडीसह 62.91 रुपये प्रति किमी तर सबसिडीव्यतिरिक्‍त 75.51 रुपये प्रतिकिमी इतका दर निश्‍चित करण्यात आला व या दरात शहर बस चालविण्यास निविदाधारकांनी संमती दर्शविली.

त्यानुसार प्रशासनाने दोन्ही बससेवेसाठी नेमणूक करावयाच्या बस ऑपरेटरसंदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती सभेकडे मंजुरीसाठी सादर केला होता. यावर सदस्य दिनकर पाटील, संतोष साळवे, समीर कांबळे, सुषमा पगारे, कल्पना पांडे, प्रा. शरद मोरे यांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. बससेवेसाठी जागा कुणाची वापरणार, शहरासह परिसरातील प्रत्येक ठिकाणी बससेवा पुरविणार का, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसह स्वातंत्र्यसैनिकांना सवलतीत प्रवास दिला जाणार का असे अनेक प्रश्‍न विचारण्यात आले. तसेच, शहरात एखाद्या ठिकाणी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही तर अशावेळी संबंधित ठेकेदारास ठरल्यानुसार प्रति किमी दर देणार का आणि शहर बससेवा सुरू झाल्यानंतर दरमहा मनपाला किती तोटा सहन करावा लागू शकतो असा प्रश्‍न संतोष साळवे व दिनकर पाटील यांनी विचारला. यावर सभापती निमसे यांनी सदस्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य व सविस्तर उत्तर देण्याची सूचना केली. 

शहर बससेवेसाठी तीन डेपो असतील. तपोवन येथे बांधण्यात येणार्‍या डेपोसाठी 32 कोटींचा खर्च अपेक्षित असून, आडगाव ट्रक टर्मिनस येथे पीपीपी तत्त्वावर बसडेपो साकारला जाईल, तर नाशिकरोडला आनंदनगर येथील एसटी महामंडळाचा बसडेपो मनपाच्या ताब्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या 2015 पर्यंत अडीचशे बसेस होत्या. मात्र, बससेवा तोट्यात जाऊ लागल्याने एसटीने टप्प्याटप्प्याने बसेस बंद करून आजमितीस केवळ 130 बसेस सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

वर्षाला 20 कोटींचा तोटा 

शहर बसेस सुरू झाल्यानंतर किती तोटा होऊ शकतो, असा अंदाज सदस्यांनी विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनी वर्षाकाठी 20 कोटींपर्यंत तोटा येऊ शकतो, असे सांगितले. 113 कोटी रुपये डिझेल व सीएनजी बसेससाठी खर्च येईल. 78 कोटी इलेक्ट्रिक बसेससाठी तर चार कोटी आयटी व 15 कोटी रुपये चालक व टीसी यांच्यावर खर्च होऊ शकतो. म्हणजे जवळपास 215 कोटी रुपये इतका खर्च होऊ शकतो. तर 185 ते 190 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्‍त केला. मोठ्या प्रमाणावर तोटा होत असल्याने सदस्यांनी मनपाची तेवढी आर्थिक स्थिती नसल्याने तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची सूचना केली. त्यावर बसेसवर जाहिराती व बसस्थानकांमधील जागेचा कमर्शियल वापर करून तोटा कमी करता येऊ शकतो, असे सभापती निमसे व कार्यकारी अभियंता चव्हणके यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार 

मनपावर आर्थिक बोजा नको म्हणून मनपाने एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करून असलेली बसस्थानके व डेपो अत्यल्प दराने मिळावे, अशी मागणी केली होती. याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याबरोबरही एसटी व मनपा अधिकार्‍याची बैठक होऊन एसटीचा तोटा कमी होण्यासाठी मनपा बससेवा सुरू करत असल्याने बसस्थानके कमीत कमी दराने व संयुक्‍त वापराकरिता मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यास रावते यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे मनपावरील आर्थिक बोजा कमी होणार आहे.