Mon, Jun 01, 2020 08:18होमपेज › Nashik › निफाड, नांदगाव, सिन्नर येथे अर्ज दाखल

निफाड, नांदगाव, सिन्नर येथे अर्ज दाखल

Published On: Oct 01 2019 2:02AM | Last Updated: Sep 30 2019 10:59PM
नाशिक : प्रतिनिधी

विधानसभेसाठी सोमवारी (दि.30) निफाड, सिन्नर, नांदगाव मतदारसंघातून प्रत्येक एक अर्ज दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. उर्वरित मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यर्ंत चौघांनी अर्ज दाखल केले आहे.

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात गर्दी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र, निफाड, सिन्नर व नांदगाव वगळता इतर मतदारसंघांची पाटी कोरी होेती. त्या बदल्यात उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सुनील तुकाराम सोनवणे तर निफाडमधून जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. सिन्नरमधून अमोल अरुण भगत यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, नाशिक शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम तसेच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात मात्र, एकही अर्ज दाखल झाला नाही.

 नाशिक शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम तसेच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून होत आहे. मध्य मतदारसंघातून 8 उमेदवारांनी 12 अर्जांची खरेदी केली. अर्ज नेणार्‍यांमध्ये काँग्रेसचे राहुल दिवे, वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे तसेच भाजपाकडून सुरेश पाटील यांचा समावेश आहे. तर नाशिक पश्चिममधून 36 इच्छुकांनी अर्ज खरेदी केली आहे. भाजपाचे हिमगौरी आडके, प्रदीप पेशकार व मयूर अलई; शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर, विलास शिंदे व मामा ठाकरे तर राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे तसेच आरपीआयचे दीपक लोंढे आदी अर्ज घेऊन गेले आहेत.   नाशिक पूर्वमधून आतापर्यंत 28 जणांनी अर्ज नेले आहेत. सोमवारी (दि.30) अर्ज नेणार्‍यांमध्ये दामोदर मानकर, विजय राऊत, गणेश कदम, सत्यभामा गाडेकर, योगेश कापसे, संतोष नाथ आदींचा समावेश आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमधून 12 इच्छुकांनी 22 अर्जांची खरेदी केली. माजी आमदार निर्मला गावित, काशीनाथ मेंगाळ, हिरामण खोसकर, अर्पणा खोसकर, योगेश शेवरे, पृथ्वीराज अंडे आदींनी अर्ज खरेदी केले आहेत.