Mon, Jan 25, 2021 05:47होमपेज › Nashik › मनसे शहराध्यक्षपदाची धुरा मटालेंच्या खांद्यावर 

मनसे शहराध्यक्षपदाची धुरा मटालेंच्या खांद्यावर 

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:28AMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून, माजी महापौर अशोक मुर्तडक यांना पक्षात बढती देत पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी पक्षात या पदावर केवळ माजी आमदार वसंत गिते आणि अतुल चांडक यांनाच स्थान देण्यात आले होते. 

मनपातील सत्तेनंतर झालेल्या निवडणुकीत मनसेला सपाटून मार खावा लागला. यामुळे अनेकांनी भाजपा आणि शिवसेना पक्षांच्या जहाजात उड्या घेतल्या. परंतु, मनसेतील काही ठराविक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी अशा हलाखीच्या काळातही मनसे प्रमूख राज ठाकरे यांची साथ सोडली नाही. यामुळे मनसेला काही प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने महापालिकेत संख्याबळ तरी गाठता आले.

गेल्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपविले होते. त्यानंतर ढिकले यांना पक्षाचे उपाध्यक्षपदही बहाल करण्यात आले. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. परंतु, बहुतांश कार्यकर्त्यांनी ढिकले यांचे नेतृत्व कबूल केले होते. वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत मनसेला ताकदवान उमेदवार न मिळाल्याने आणि सत्तेच्या काळात अधिक सक्षमतेने वेळीच कामे पूर्ण न करता आल्याने नागरिकांची नाराजी ओढावून घ्यावी लागली होती. याचमुळे निवडणुकीत मनसेला पाचवर समाधान मानावे लागले होते.

अर्थात, या निवडणुकीनंतर अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी शहराध्यक्षपदाची धुरा अन्य कुणाकडे तरी द्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली होती. परंतु, मनपातील पडता काळ आणि इतरही ठिकाणची मोर्चेबांधणी करावयाची असल्याने त्यावेळी याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीची गरज ओळखून राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.18) सकाळी माजी महापौर अशोक मुर्तडक, अनिल मटाले, अ‍ॅड. राहुल ढिकले यांना कृष्णकुंजवर बोलावून बैठक घेतली. त्यात मुर्तडक यांना पक्षाचे सरचिटणीसपद तर माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

निवडणुकीच्या तयारीला लागा 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे अ‍ॅड. ढिकले यांनी सांगितले. त्यादृष्टीने प्रत्येक प्रभागनिहाय व विभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन रुपरेेषा ठरविण्यात येणार आहे. पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षीय संघटना बांधणीवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.