Tue, Nov 19, 2019 15:18होमपेज › Nashik › येवला : स्वपक्षातून भुजबळांना खुले आव्हान!

येवला : स्वपक्षातून भुजबळांना खुले आव्हान!

Published On: Sep 05 2019 7:18PM | Last Updated: Sep 05 2019 7:28PM
येवला : प्रतिनिधी

भुजबळांच्या घरवापसीच्या चर्चांना फुल्ल हवा मिळत असताना भुजबळ मात्र सेना प्रवेशासंदर्भात काहीही उघडपणाने बोलत नाहीत, तर स्थानिक शिवसेना येवला शहर पदाधिकारी मात्र भुजबळांना सेनेत या असे साकडे घालीत आहेत. दुसरीकडे भुजबळ अपक्ष लढणार का ? असा सवाल राष्ट्रवादीचे ॲड. माणिकराव शिंदे यांनी जाहीर पत्रकाद्वारे केला. यापुर्वीही माणिकराव शिंदे यांनी जाहीर पत्राद्वारे भुजबळांऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. सन २००४ मध्ये भुजबळांना येवल्यात आणणारे माणिकराव शिंदे यांनी सन २००९ मध्ये भुजबळांविरुध्द उमेदवारी जाहीर करीत रणशिंग पुकारले होते. त्या नंतर आता पुन्हा दहा वर्षांनी राष्ट्रवादीत राहूनच शिंदे यांनी भुजबळांना खुले आव्हान दिले आहे.

आमदार छगन भुजबळ यांनी काल येवले लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना येथील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. परंतु, कोणत्या पक्षातून लढणार  हे सांगितले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या निवडणुकी संदर्भातील बैठकांना आमदार छगन भुजबळांनी उपस्थित असणे आवश्यक होते. परंतु, छगन भुजबळ यांनी वेगवेगळे कारण पुढे करीत या बैठकांना गैरहजर राहिले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यातही भुजबळ अनुपस्थित राहिले. या सर्व घटनाक्रमाचा आढावा घेतला, तर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली असल्याचे वातावरण त्यांनी स्वतःच तयार केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रवेशाची वातावरण निर्मितीही करत राहिले. कालच्या येवला दौऱ्यातही शिवसेने बरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिवसेना प्रवेशाच्या वातावरणाला पुन्हा ‘हवा’ दिली, असा आरोप माणिकराव शिंदे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

बुधवारी नाशिक येथे शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी जिल्हा व मतदार संघातील शिवसैनिक व इच्छुक उमेदवारांचे मत जाणून घेतले, कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीस राऊत यांनी फेटाळून लावले. खा.संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील भुजबळ प्रवेशाच्या शक्यतेच्या नकारानंतर येवले येथे भुजबळांनी येवले लासलगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, परंतु कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख केला नाही. असेही माणिकराव शिंदे यांनी पत्रकात नमुद केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इच्छुकांच्या मुलाखतीनंतर जाहीर करणार असल्याचे सांगत मी स्वतः येवले लासलगाव मधून उमेदवारी मागितली आहे. अद्याप मुलाखत बाकी आहे. माझ्या दावेदारीची व त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी माणिकराव शिंदे यांनी केली आहे.

भुजबळांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण केलेल्या संशयास्पद वातावरणामुळेच परस्पर उमेदवारी जाहीर करून त्यांनी त्यांची आगतिकता दाखवलेली आहे. हीच बाब आपल्याला उमेदवारी मिळण्यास हातभार लावणारी आहे, असा दावा माणिकराव शिंदे यांनी केला आहे. एखादा अपक्ष उमेदवारच या पद्धतीने स्वतः उमेदवारी जाहीर करू शकतो. हा अनुभव लक्षात घेता भुजबळ येवल्यातून अपक्ष लढणार का ? हा प्रश्न जनतेला पडला आहे.

भुजबळ साहेबांना राजकीय पक्षाची उमेदवारीही या वेळेस विजयापर्यंत नेऊ शकणार नाही अशी परिस्थिती असल्याचे उल्लेख करीत स्थानिक आमदार असावा ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची व जनतेचीही इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार यांच्या विश्वासामुळे आ.छगन भुजबळ मंत्री, उपमुख्यमंत्रीपद अनेक वर्ष सांभाळत सत्ता स्थानी राहिले. त्याच्या कडून हि अपक्ष उमेदवारी योग्य ठरणार नाही. भुजबळ साहेबांनी माझ्या उमेदवारी करताच अनुकुलता दर्शवत मला येवले लासलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यासह निवडूण आणण्याकरिता प्रयत्न करावे, अशी जाहीर विनंती सुध्दा माणिकराव शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.