Mon, Jul 06, 2020 10:22होमपेज › Nashik › कांदा साठेबाजी रोेखण्यासाठी प्रशासन सतर्क

कांदा साठेबाजी रोेखण्यासाठी प्रशासन सतर्क

Last Updated: Dec 04 2019 1:07AM
तीन-चार दिवसांमध्ये जिल्ह्यात कांदा दराने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असून, खुल्या बाजारात कांद्याने 90 ते 100 रुपये दर गाठले आहेत. कांद्याचे वाढलेले भाव बघता साठेबाजी होण्याची शक्यता असल्याने कांदा व्यापार्‍यांच्या गोदामांची नियमित तपासणी करावी. त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. तसेच साठेबाजी करणार्‍यांविरोधात कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तालुक्यांना दिले आहेत. 

अवकाळी पावसाने कांदा पिकाला फटका बसला असून, उत्पादनात घट झाली. साठेबाजीने डोकेवर काढल्याने खुल्या बाजारातील दर गगनाला भिडले होते. त्यामुळे हे दर अटोक्यात आणण्यासाठी मोठ्या व्यापार्‍यांना 500 तर लहान व्यापार्‍यांना 100 क्विंटलपर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा केंद्र सरकारने घातली होती. त्याचा परिणाम म्हणजे खुल्या बाजारातील दर नियंत्रणात आले. परंतु, त्यानंतरही साठवणुकीच्या मर्यादा शिथिल न केल्यामुळे सरकारला टीकेचे धनी बनावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नवीन कांदा बाजारात येऊ लागला आहे. कधी नव्हे, ते बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या कांद्याला क्विंटलला सरासरी 12 हजार 250 रुपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. घाऊक बाजारात कांदाच्या दराने अचानक उसळी घेतली अ्सताना खुल्या बाजारातील कांद्याच्या दराने नव्वदी पार केली आहे.

अवकाळीमुळे झालेले नुकसान बघता तसेच बाजारात सध्या कांदा भाव खात असल्याने तसेच येत्या काळात त्याची साठेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच शक्यता गृहीत धरून जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी तहसीलदारांना कांदा व्यापार्‍यांच्या गोदामांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.