होमपेज › Nashik › आदित्य ठाकरे यांची उद्या मालेगावी सभा

आदित्य ठाकरे यांची उद्या मालेगावी सभा

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 17 2019 11:17PM
मालेगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौर्‍यावर निघाले आहेत. पहिल्या टप्प्यात जळगाव, धुळे, नाशिक-अहमदनगर या चार जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 19) ठाकरे यांचे मालेगावी आगमन होणार असून, त्यांची बाजार समितीच्या आवारात सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणार्‍या मतदारांचे आभार मानतानाच आगामी विधानसभेतही मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 जुलैला धुळेमार्गे ते मालेगावला येणार आहेत. त्यांचे झोडगे, चाळीसगाव फाटा येथे स्वागत होईल. पवारवाडीतील जनता सायजिंग ते भेट देतील. त्यानंतर गिरणा पूल ते बाजार समितीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येईल.

याठिकाणी सभा होणार आहे. याप्रसंगी शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल योजनेच्या लाभार्थ्यांना सातबारा उतारा वाटप होणार आहे. अतिक्रमणधारक स्त्री -पुरुषांच्या नावाने हा उतारा राहणार असून, तालुक्यातून 4 हजार 949 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यातील प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना सातबारा सुपूर्द केला जाणार आहे. याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरपत्राचेही वितरण होणार असल्याची माहिती महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांनी सांगितले. सभेनंतर शासकीय विश्रामगृहात ठाकरे हे काही शिष्टमंडळांशी चर्चादेखील करणार आहेत. याप्रसंगी खासदार संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर, गुलाबराव पाटील, राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह प्रमुख नेतेही उपस्थित असतील, असे संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समितीचे सभापती जे. पी. बच्छाव, गटनेते नीलेश आहेर, माजी नगरसेवक मनोहर बच्छाव आदी पदाधिकारी उपस्थित होते.