Fri, Jun 05, 2020 18:10होमपेज › Nashik › खा. सुळे यांच्या दौर्‍यात भुजबळांची अनुपस्थिती

खा. सुळे यांच्या दौर्‍यात भुजबळांची अनुपस्थिती

Published On: Aug 27 2019 1:49AM | Last Updated: Aug 26 2019 10:51PM
नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी (दि.27) जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांच्या बैठका होणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात ज्यांची शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा झाली, ते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांची मात्र या दौर्‍यात अनुपस्थिती जाणवणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. पक्षाच्या या पडझडीकडे दुर्लक्ष करून दोन्ही काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. तर राष्ट्रवादीचा किल्ला पक्षाध्यक्ष शरद पवार हे लढवित असून, आता त्यांच्या कन्या सुळे याही रिंगणात उतरल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्या पिंजून काढत असून, मंगळवारी त्या नाशिकमध्ये दाखल होत आहेत. या दौर्‍यात सिडकोत त्या माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यालयात भेट देणार आहेत. त्यानंतर भोळे मंगल कार्यालयात मेळावा होणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी भवनात पदाधिकार्‍यांच्या बैठका होणार आहेत. या बैठका संपताच नांदगावला त्या रवाना होणार असून, तेथेही बैठका घेण्यात येणार आहेत.

या सार्‍या भरगच्च कार्यक्रमात आमदार छगन भुजबळ हे त्यांच्यासोबत उपस्थित नसणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भुजबळ हे आजारी असल्याने ते मुंबईत असल्याचेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र गेल्या आठवड्यात याच भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली. स्थानिक सेना पदाधिकार्‍यांनी भुजबळ यांना सेनेत प्रवेश देऊ नये, म्हणून ‘मातोश्री’ची पायधूळही झाडली. त्यातच भुजबळ यांची सुळे यांच्या दौर्‍यात जाणवणारी अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरणार आहे. ते अनुपस्थित राहणार असले तरी त्यांचे पुत्र आमदार पंकज आणि माजी खासदार समीर हे मात्र सुळे यांच्या दौर्‍यात सहभागी होणार आहेत, हे विशेष!