Fri, Jun 05, 2020 06:36होमपेज › Nashik › व्हर्च्युअल क्लासरूमबाबत पंतप्रधानांसमोर प्रात्यक्षिक सादर

व्हर्च्युअल क्लासरूमबाबत पंतप्रधानांसमोर प्रात्यक्षिक सादर

Published On: Aug 02 2019 1:18AM | Last Updated: Aug 01 2019 11:25PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये सीएसआर फंडातून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.

व्हर्च्युअल क्लासरूमबाबत सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत माहिती देऊन या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले.

पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्ह्याने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पद्धतीने व्हर्च्युअल क्लासरूम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. शहर व गाव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रयोग नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. हा उपक्रम नाशिक जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगळे यांनी यावेळी नमूद केले.  

या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी चार कोटी रुपयांपर्यंतचा निधी सामाजिक बांधिलकी (सीएसआर) तून जमा करण्यात येणार आहे. निवडलेल्या शाळांना व्हर्च्युअल क्लासरूमसाठी संगणक, एलईडी देण्यात येणार आहेत. नाशिकच्या केंद्रातून एकाचवेळी विविध तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.