Tue, Jun 02, 2020 14:39होमपेज › Nashik › ८४ कोटींच्या कामांना आचारसंहितेचा फटका

८४ कोटींच्या कामांना आचारसंहितेचा फटका

Published On: Sep 24 2019 1:41AM | Last Updated: Sep 23 2019 10:27PM
नाशिक : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची जवळपास 84 कोटी रुपयांची कामे अडकली असून, आता निवडणुका संपल्यानंतरच या खर्चाला वाट मोकळी होणार आहे. 
आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल, असा कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्थायी तसेच सर्वसाधारण सभांमधून अनेकदा आचारसंहितेच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. आचारसंहितेच्या कचाट्यात विकासकामे अडकू नये म्हणून प्रशासकीय, तांत्रिक मान्यतांचे सोपस्कार वेळेत पार पाडण्याची मागणीही वारंवार करण्यात आली होती तरीही 84 कोटी रुपयांची कामे आचारसंहितेत अडकली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, तेव्हाच आचारसंहिताही शिथिल होणार आहे. 

खरे तर, या आधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फेरा होता. यातून बाहेर पडत नाही तोच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली म्हणजे, आधी जवळपास महिनाभराचा कालावधी आचारसंहितेत गेला. आता पुन्हा तेवढाच कालावधी यात जाणार आहे. दोन्ही आचारसंहितेचा कार्यकाळ साठ दिवसाचा आणि तेवढे दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाली. ही बाब आधीच ध्यानात घेऊन यंत्रणेने कामकाजाला गती देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र समोर आले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या काही योजना तांत्रिक मान्यतेत अडकल्या. बंधार्‍यांची जवळपास 34 कामे निविदास्तरावर असून तीही अडकली आहेत. याशिवाय बांधकामचे तिन्हीही विभाग, आरोग्य, कृषी या विभागांचाही निधी आचारसंहितेमुळे  खर्च होणार नाही. त्यासाठी आचारसंहिता संपुष्टात येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.