Fri, Jul 10, 2020 08:32होमपेज › Nashik › नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान

नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान

Published On: Jul 21 2019 1:26AM | Last Updated: Jul 21 2019 1:26AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 29 जागांसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे. 8 हजार 692 सभासदांपैकी 6 हजार 846 सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत मतदानात दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. सत्ताधारी  कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रगती’ व तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील ‘क्रांतिवीर’ पॅनलमध्ये लढत आहे.  दोन्ही पॅनलने विजयाचा दावा केला आहे. रविवारी (दि.21) चोपडा लॉन्स येथे सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होईल. 

क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, 6 विश्‍वस्त, 2 महिला प्रतिनिधी तर, 17 तालुका प्रतिनिधी अशा एकूण 29 जागांसाठी संस्थेच्या मुख्यालयात शनिवारी (दि.20) सकाळी 7 ते 5 दरम्यान मतदान झाले. मतदानासाठी सभासदांनी गर्दी केली होती तर, समाजबांधवांचा उत्साह जोरात होता. मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची व शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. 

निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी सरस्वती पूजन केले. तसेच दोन्ही पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार कोंडाजी आव्हाड व पंढरीनाथ थोरे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन मतदानास सुरुवात झाली.  

सकाळच्या पहिल्या टप्यात मतदानासाठी सभासदांनी मोठी गर्दी केली होती. 11 पर्यंत 30 टक्के मतदान झाले होते. सभासदांच्या नावात बदल असल्याने अनेक केंद्रांवर सभासदांना मतदानापासून रोखण्यात आले. त्यावेळी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. काही मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या हस्तक्षेपावर दोन्हा बाजूने आक्षेप घेतल्याने  किरकोळ वाद झाले.

नांदगाव तालुक्यासाठी असलेल्या बूथवर लाइट गेल्याने काही वेळ अंधारात मतदान करावे लागले. सिन्‍नर तालुका बूथवर उमेदवार मनोज बुरकुल व शशिकांत आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. पावसाचा व्यत्ययानंतर पुन्हा दुपारी ग्रामीण भागातील सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. दोनपर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद झाली. चारच्या सुमारास झालेल्या पावसाचा मतदानावर काहीसा परिणाम दिसून आला. सायंकाळी 5 पर्यंत 39 बूथवर 79 टक्के मतदान झाले. मतदानासाठी 351 कर्मचारी कार्यरत होते. रविवारी (दि.21) चोपडा लॉन्सवरील हॉलमध्ये मतमोजणीस सकाळी 8 पासून सुरुवात होईल.