Wed, Jun 03, 2020 21:45होमपेज › Nashik › महापालिकेचे ७१ नगरसेवक आमदारकीच्या आखाड्यात

महापालिकेचे ७१ नगरसेवक आमदारकीच्या आखाड्यात

Published On: Sep 27 2019 2:15AM | Last Updated: Sep 26 2019 11:34PM
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेतील बहुतांश नगरसेवक आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. एकूण 127 नगरसेवकांपैकी तब्बल 71 नगरसेवकांनी महापालिकेकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज सादर केले असून, 71 पैकी 31 नगरसेवक तर एकट्या भाजपाचेच आहेत. यामुळे निवडणुकीत स्वपक्षातीलच प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी आणि नाराजी तर पाचवीलाच पूजलेली राहणार असल्याने अशा असंतुष्टांना शांत करण्यासाठी भल्याभल्यांच्या नाकीनव येणार आहे. 

आजपासून (दि.27) निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ मिळविण्यासाठी मनपाच्या कर संकलन विभागाकडे नगरसेवकांची रीघच लागली आहे. जणू काही पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार, या अविर्भावात अनेक नगरसेवक हा दाखला मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध प्रकारचा कर आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागते. आतापर्यंत 71 नगरसेवकांनी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी एकट्या भाजपाचेच 31 नगरसेवक समोर आले आहे. शिवसेना-भाजपा युतीकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने या सर्व गर्दीतून कुणाला तिकीट मिळते याकडे लक्ष लागून आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. पक्षाची उमेदवारी मिळेल, त्याला मिळेल.

परंतु, ऐनवेळी धावपळ नको म्हणून हा सर्व खटाटोप केला जात आहे. विद्यमान आमदार आणि त्यापूर्वीच्या 2009 मधील आमदार पाहिले तर संबंधित उमेदवार हे नगरसेवकांमधूनच निवडून गेलेले आहेत. यामुळे यावेळीदेखील नगरसेवकांमधूनच मोठी चुरस निर्माण झाली आहे. मनपाच्या विविध कर संकलन व मूल्य निर्धारण विभागाकडे 71 अर्ज प्राप्‍त झाले असून, त्यापैकी पाच अर्जदारांना ‘ना हरकत दाखले’ (एनओसी) देण्यात आले असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.