Sat, Oct 24, 2020 09:26होमपेज › Nashik › 708 कोरोना योद्ध्यांची महापालिकेमध्ये नेमणूक

708 कोरोना योद्ध्यांची महापालिकेमध्ये नेमणूक

Last Updated: Aug 12 2020 10:39PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणार्‍या विविध 15 पदांवर 708 कोरोना योध्द्यांची महापालिकेने मानधनावर नियुक्‍ती केली आहे. एकूण 849 पदांसाठी गेल्या 15 दिवसांपूर्वी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. यात मात्र मनपाला एमबीबीएस डॉक्टर्स पूर्ण क्षमतेने मिळू शकले नाहीत. 

पाच महिन्यांपासून महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. या दोन्ही विभागांतील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांना तर रात्रंदिवस काम करावे लागत आहे. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने सर्व प्रकारचा ताण आहे. त्याच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य, वैद्यकीय कर्मचार्‍यांवर ताण येऊन पडल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुरेसे मनुष्यबळ भरण्यासाठी मानधनावर 15 विविध पदांसाठी जाहिरात करून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार गेल्या 15 दिवसांपूर्वी ही भरतीप्रक्रिया पूर्ण झाली. त्यातून 849 पदांकरता 708 उमेदवार मनपाला मिळाले असून, त्यांना नियुक्‍तिपत्रेही देण्यात आली आहेत. यामुळे आता मनपाकडे तीन महिन्यांसाठी का होईना, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आली नाहीच तर संबंधितांना मुदतवाढही दिली जाऊ शकते.  मनपाला 100 बीएएमएस डॉक्टर मिळाले आहेत. त्याचप्रमाणे मल्टिस्किल हेल्थ वर्कर्ससाठी 100  पदे होती. या पदांसाठी 100 उमेदवार मनपाने नियुक्‍त केले आहेत. एमबीबीएससाठी 50 जागा होत्या. त्यापैकी दोनच उमेदवार मिळाले. याशिवाय फिजिशियनपदासाठी 10, भूलतज्ज्ञ 10, मानसोपचारतज्ज्ञ 30, रेडिओलॉजिस्ट पाच अशा अत्यावश्यक पदांसाठीदेखील थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले होते. मात्र, त्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक, मल्टिपल हेल्थ वर्कर, बीएएमएस (आयुष) ही पदे पूर्णपणे भरली गेली. 

साडेआठ कोटींची तरतूद

संबंधित सर्व मानधनावरील 849 पदांसाठी मनपा प्रशासनाने साडेआठ कोटींची गरज लागणार असल्याचा अंदाज बांधला असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. यामुळे संबंधित कर्मचार्‍यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण होणार नाही. एमबीबीएस या पदासाठी तीन लाख रुपये मानधन देऊनही 50 पैकी आठच उमेदवार मनपाला मिळाले.

भरण्यात आलेल्या जागा

फिजिशियन- दोन, भूलतज्ज्ञ- एक, रेडिओलॉजिस्ट- एक, एमबीबीएस- आठ, सायकोलॉजिस्ट- दोन, मायक्रोबायोलॉजिस्ट- चार, बीएएमएस (आयुष)- 100, स्टाफ नर्स- 187, लॅब टेक्निशियन- 50, मिश्रक- 65, रेडिओग्राफर- पाच, आहारतज्ज्ञ- दोन, समुपदेशक- 30, एएनएम- 142, मल्टी स्कील हेल्थ वर्कर- 100.

 "