Wed, Jun 03, 2020 20:20होमपेज › Nashik › खरिपासाठी 5 बँकांकडून 580 कोटी 

खरिपासाठी 5 बँकांकडून 580 कोटी 

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 1:56AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील  शेतकर्‍यांना  खरिपासाठी  तत्काळ पीककर्ज मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बँक अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. प्रमुख पाच बँकांनी 580 कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती मांढरे यांनी बैठकीनंतर दिली.  

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बँकांमार्फत खरिपासाठी पीककर्ज वाटप करण्यात येत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी आज त्याचा आढावा घेतला. दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी आधीच होरपळून निघाला आहे. यंदाही पावसाला उशीर झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला. नंतर पावसाने पुन्हा पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहे. 6 तालुक्यांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी जिल्ह्यात 274 टँकर आणि 3 चारा छावण्या सुरू आहेत.  

जिल्ह्याचे यंदाचे पीककर्जाचे उद्दिष्ट तीन हजार 143 कोटी रुपये आहे. त्यात  जिल्हा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या पाच बँकाना 1800 कोटींचे  तर उर्वरीत 20 बँकांना 1300 कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे 1800 कोटींचे उद्दिष्ट असणार्‍या बँकांवर जिल्हा प्रशासनाने जादा लक्ष केंद्रीत केले आहे. 

बॅक ऑफ महाराष्ट्रने  414  उद्दिष्टापैकी 228 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने 182 पैकी 57 कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 480 पैकी 134 कोटी, बँक ऑफ बडोदाने 396 कोटीपैकी 65 कोटी, स्टेट बँकेने 393 पैकी 96.25 कोटी असे 580.25 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.