Fri, May 29, 2020 08:54होमपेज › Nashik › जिल्ह्यात ५३ लाखांचा मद्यसाठा जप्‍त

जिल्ह्यात ५३ लाखांचा मद्यसाठा जप्‍त

Last Updated: Oct 14 2019 11:55PM
नाशिक : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या संयुक्‍त कारवाईत जिल्ह्यातून तब्बल 53 लाख रुपयांचा 68 हजार 953 लिटर मद्यसाठा जप्‍त केला आहे. त्याचप्रमाणे 14 शस्त्रेही जप्‍त केली आहेत. 

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पैशांची वाहतूक, अवैध मद्यसाठा वाहतूक किंवा विक्री करणारे, शस्त्र बाळगणारे यावर कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरात पोलीस आयुक्‍तालयातर्फे तर ग्रामीण भागात ग्रामीण पोलिसांतर्फे तसेच संपूर्ण जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई केली जात आहे. त्यानुसार यंत्रणांनी कारवाई करीत 68 हजार 953 लिटर दारूसाठा जप्‍त केला आहे. 

या दारूची किंमत 52 लाख 97 हजार 801 रुपये इतकी आहे. यात शहर पोलिसांनी 140 लिटर, ग्रामीण पोलिसांनी 22 हजार 911 लिटर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने 45 हजार 901 लिटर दारू जप्‍त केली आहे. त्याचप्रमाणे शहर पोलिसांनी कारवाई करीत 2 लाख 45 हजार 200 रुपयांची 11 शस्त्रे तर ग्रामीण पोलिसांनी 700 रुपयांची तीन असे एकूण 14 शस्त्रे जप्‍त केली आहेत. तसेच, नाकाबंदी दरम्यान 66 हजार 893 वाहनांची तपासणी केली आहे.