Fri, Jul 10, 2020 08:34होमपेज › Nashik › पुनद धरण रस्त्यावर 50 दुचाकी घसरल्या; 50 जणांना दुखापत

पुनद धरण रस्त्यावर 50 दुचाकी घसरल्या; 50 जणांना दुखापत

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 06 2019 11:13PM
कळवण : वार्ताहर

पुनद धरण ते काठरा या रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी टाकण्यासाठी मशीनरीच्या सहाय्याने चारी करण्यात आल्याने माती रस्त्यावर आली आहे. त्यातच पाऊस पडल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, त्यातून मार्गक्रमण करताना अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. दिवसभरात 50 दुचाकी घसरून पडल्याने वाहनचालकांना दुखापत झाली. तर अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले.

चिखल  दलदलीचा अनुभव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांनी घेतला. बंधारपाडा व जयदर येथे बैठकीसाठी पवार दाम्पत्य आले होते. बंधारपाडा येथे जात असताना या रस्त्यावर चिखलाच्या दलदलीतून मोटरसायकलींवरून आदिवासी दाम्पत्य घसरून पडल्याचे त्यांनी बघितले. त्याचवेळी सटाणा नगर परिषदेचे पदाधिकारी पाइपलाइन कामाची पाहणी करून रस्त्यावरून जात असताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या पदाधिकार्‍यास खडे बोल सुनावले. पुनद प्रकल्प परिसरातील बंधारपाडा, उंबरगव्हाण, शिरसापाडा, उंबर्‍यामाळ, जांभाळ, महाल, उंबरदे, चोळीचा माळ, औत्यापाणी, धुमंदर, खळीचापाडा, गढीचा पाडा, मोर्‍याहूड या भागातील नागरिक जयदर येथे बाजारासाठी जातात. मात्र, त्यांना या रस्त्याने जाताना चिखलातून मार्गक्रमण करावे लागले. आदिवासी बांधवांसाठी पाइपलाइन जीवघेणी ठरू लागली असल्याने शासनाने या योजनेचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली.

जलवाहिनीला शेतकर्‍यांचा विरोध

पुनद धरण ते सुपलेदिगर ते काठरा या रस्त्यावर पाइप टाकण्यासाठी जेसीबी व पोकलँड मशीनद्वारे चारी करण्यात येत आहे. या कामामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतातील पाइपलाइन मशीनरीद्वारे फुटत आहे. त्यामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुनद धरण कोरडेठाक पडल्याने विहिरीवरील पाण्याद्वारे शेतीला पाणी दिले जात असून, जलवाहिनी योजनेमुळे आदिवासी बांधवांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. जलवाहिनी ठेकेदाराने आदिवासी बांधवांचे नुकसान भरून द्यावे नाहीतर पेसा कायदा अंतर्गत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.