Tue, Jun 02, 2020 13:31



होमपेज › Nashik › नाशिकसाठी हवे ५ हजार दलघफू पाणी

नाशिकसाठी हवे ५ हजार दलघफू पाणी

Last Updated: Oct 11 2019 11:17PM




नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासाठी पुढील वर्षाकरीता पाच हजार दलघफू पाण्याचे आरक्षण करावे, अशी मागणी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे मनपाने गंगापूरमधील आरक्षणात घट करून मुकणेतून वाढीव पाण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची वार्षिक पाणी आरक्षण बैठक येत्या मंगळवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता होणार आहे. 

जिल्ह्यावर यंदा पावसाने मेहरनजर दाखविली आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमध्ये एकत्रित उपयुक्त पाणीसाठा 65,275 दलघफू (99 टक्के) इतका आहे. त्यामुळे यंदा जिल्हावासीयांची पाण्याची चिंता सरली आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबर ते 31 जुलै याकाळात वार्षिक पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार यंदा मनपाने गतवर्षीपेक्षा 100 दलघफू अधिक पाण्याची मागणी नोेंदविली आहे. नाशिक मनपासाठी गेल्यावर्षी 4 हजार 900 दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. त्यात गंगापूरच्या 4,200, दारणातील 400 तर मुकणेमधील 300 दलघफू पाण्याचा समावेश होता. दरम्यान, पुढील वर्षासाठी मनपाने 5 हजार दलघफू मागणी नोंदविली आहे. 

मनपाने पुढील वर्षाकरीता गंगापूरमधून 3,600 दलघफूट पाण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी दारणेचे 400 दलघफू आरक्षण तसेच ठेवताना मुकणेमधून 700 दलघफू वाढीव पाण्याची मागणी करीत 1 हजार दलघफू आरक्षण करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मनपाने वाढीव 100 दलघफू पाण्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, गतवर्षी 4,900 दलघफू पाणी आरक्षण करताना प्रत्यक्षात मनपाने जुलै अखेरपर्यंत 4,620 दलघफू पाणी उचलले होते. यामध्ये गंगापूरच्या 4,089, दारणेच्या 293 तर मुकणेच्या 247 दलघफू पाण्याचा समावेश आहे. 

गतवर्षी मनपासाठी करण्यात आलेले आरक्षण व प्रत्यक्षातील पाण्याचा वापर बघता जिल्हाधिकारी मंगळवारच्या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे आता शहरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. याच बैठकीत जिल्ह्यातील नगरपालिका, स्थानिक पाणी वापर संस्थांच्या पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

सचिवांकडे अंतिम मोहोर

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी आरक्षण बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केलेले आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत संबंधित विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार आहे. सचिव त्यांच्या अधिकारात नाशिक मनपासह इतर पाणी वापर संस्थांसाठी किती पाणी आरक्षण करायचे याबद्दलचा निर्णय घेतील.