Fri, Jul 10, 2020 08:51होमपेज › Nashik › चार वर्षार्ंनंतर वागदर्डी ओव्हरफ्लो

चार वर्षार्ंनंतर वागदर्डी ओव्हरफ्लो

Last Updated: Oct 09 2019 11:33PM
मनमाड : वार्ताहर

परतीच्या पावसाने तब्बल 4 वर्षांनंतर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या सव्वा लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मनमाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

एकीकडे यंदा पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे आणि धरणे तुडुंब भरली. तर दुसरीकडे मात्र मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यामुळे धरणात पाणी पाहिजे तेवढे पाणी आले नव्हते. मात्र, परतीच्या पावसाने सलग जोरदार हजेरी लावल्यामुळे वागदर्डी धरण केवळ पूर्ण भरलेच नाही तर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. 

दरम्यान, धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाया जात आहे. हे पाणी अडविणे गरजेचे असून, त्याकरिता सांडव्यावर असलेल्या भिंतीवरील लोखंडी जाळीत फळ्या बसविणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन सांडव्यावर फळ्या बसवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. 

मनमाड शहर पाणीटंचाईसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. उन्हाळा असो, हिवाळा असो अथवा पावसाळा ऋतू कोणताही असला तरी शहरातील नागरिकांच्या नशिबी कधी 8, कधी 10 तर कधी-कधी 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळते. गेल्या उन्हाळ्यात तर धरण कोरडे पडल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. मात्र, यंदा वरुणराजाची कृपा झाली आणि सलग झालेल्या परतीच्या पावसामुळे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले. याआधी 2015 मध्ये धरण पूर्ण भरले. त्यानंतर तब्बल 4 वर्षानंतर धरण ओव्हरफ्लो होण्याचा योग आला. 

धरण भरल्याचे वृत्त आल्यावर शहरातील नागरिकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे अनेक जण सहकुटुंब धरणावर जावून खात्री करून घेत होते. धरणात पाण्याचा मुबलक साठा पाहून सतत पाणीटंचाईचा सामना करणार्‍या शहरातील सव्वालाख नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.