होमपेज › Nashik › वृद्धाला फसवून एटीएम मधून काढले 33 हजार रुपये 

वृद्धाला फसवून एटीएम मधून काढले 33 हजार रुपये 

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 9:06PM
नाशिकरोड (जि. नाशिक) : वार्ताहर 

नाशिकरोड परिसरातील उपनगर येथील वृध्दाला दोघांनी फसवून त्यांच्या एटीएममधून ३३ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.  उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात युवकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनगर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. 

अशोक बाबुराव शिराळे (वय, ५९, मनपा वसाहत, महाराष्ट्र हायस्कूलजवळ, उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अशोक  शिऱाळे हे  २७ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे दोन तरुण उभे होते. त्यांनी शिराळे यांना तुम्ही बाजूला व्हा, आम्ही तुमचे पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर बाहेर आल्यावर दुसरेच कार्ड परत करत सांगितले की, तुमच्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत. त्‍यानंतर शिराळे यांनी स्टेट बॅंकेच्या शिवाजीनगरच्या शाखेतून पासबुक भरुन घेतले. बॅंक कर्मचाऱ्याने खात्यावर कमी रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्यावर शिराळे यांना धक्का बसला. त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. २७ मार्च रोजी नांदूरनाका एटीएममधून वीस हजार रुपये काढयात आले व २८ मार्च रोजी सकाळी १३ हजार रुपये काढले. शिराळे यांनी आपल्या मुलाला हा प्रकार सांगितला. नंतर उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत उपनगर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून गुन्हेगार लवकरच हाती लागतील असा विश्वास नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भारत कुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.