Fri, Sep 25, 2020 12:34होमपेज › Nashik › ‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा!

‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा!

Published On: Dec 25 2017 11:56AM | Last Updated: Dec 25 2017 11:36AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू श्री तुकाराम  महाराज यांच्या अभंगांवर पीएच.डी. करूनही भल्याभल्यांना सहजासहजी त्यांचा अर्थ उमगत नसताना, ‘थर्टी फर्स्ट’चे निमित्त साधून या  अभंगांचे विडंबन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकारामुळे वारकरी संप्रदाय व संत तुकारामाचे अनुयायी संतप्त झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर असे मेसेज पाठविणार्‍यांवर कठोर कारवाईचा  इशारा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिला आहे. मावळत्या वर्षाला निरोप  देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून, 31 डिसेंबर  थर्टी फर्स्ट) रोजी  जोरदार सेलिब्रेशन केले जाणार आहे.

यानिमित्त सोशल मीडियावर आतापासूनच एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविले जात आहेत. त्यापैकी काही मेसेजेसमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाजलेल्या अभंगांचे विडंबन केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यात चित्रविचित्र चिन्हे वापरून हे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचून वारकरी संप्रदाय व अन्य  अनुयायी संतप्त  झाले आहेत. त्यांनी या प्रकाराचा निषेध केला असून, आपल्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे.

राज्यात ठिकठिकाणच्या पोलीस अधिकार्‍यांना याबाबत निवेदने देण्यात आली असून,  मेसेज पसरवणार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. सायबर क्राइम शाखेनेही ही बाब गांभीर्याने  घेतली असून, ‘थर्टी फर्स्ट’निमित्त व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरील संदेशांवर नजर ठेवली जाणार आहे.  आक्षेपार्ह  मेसेज पाठविणार्‍यासह संबंधित ग्रुप अ‍ॅडमिन व व्हायरल व लाइक करणार्‍यांवर कारवाई केली जाणार  आहे. 

या अभंगाचे विडंबन

संत तुकारामांचा ‘भेटीलागीं जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ हा अभंग प्रसिद्ध असून,  त्यात विठ्ठलभेटीची लागलेली आस व त्यामुळे होणारी जिवाची तगमग तुकोबांनी व्यक्त केली आहे.  मात्र, या अभंगाचे ‘थर्टी फर्स्ट’निमित्त विडंबन केले जात आहे. 

 ...नाठाळाचे माथी हाणू काठी!  

तुकाराम महाराजांनी जगाला उपदेशपर अभंग गाथा लिहिली, त्यांची विटंबना होणे उचित नाही. असे शुभेच्छा संदेश रोखण्यासाठी पोलिसांचे  सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, हा प्रकार न थांबल्यासमहाराजांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ अशी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राज्य युवक प्रबोधन समितीने दिला आहे.