Mon, Nov 30, 2020 12:52होमपेज › Nashik › धुळे : महामार्गावर रात्री ट्रक अडवणे 'त्‍या' ३ पोलिसांना पडले महागात

धुळे : महामार्गावर रात्री ट्रक अडवणे 'त्‍या' ३ पोलिसांना पडले महागात

Last Updated: Nov 21 2020 8:07PM
धुळे :  पुढारी वृत्तसेवा

मुंबई - आग्रा महामार्गावरुन जाणा-या ट्रक चालकांची रात्री अडवणूक करणे तिघा पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगर पोलिस ठाण्यातील या तीन कर्मचा-यांना पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी निलंबित केले आहे.

धुळे शहरातुन जाणा-या मुंबई - आग्रा महामार्गावर अवधान शिवारात टोल नाका तयार करण्यात आला आहे. हा टोल नाका मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असल्याने या पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी रात्री टोलनाक्यावर वसुली करण्यासाठी थांबत असल्याच्या तक्रारी वरीष्ठ स्तरावर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या टोल नाक्यावर ट्रक चालकांना त्रास देणारे कर्मचारी शोधण्याची सूचना थेट पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली होती.

त्यानुसार पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी गुप्त पध्दतीने या टोलनाक्यावर रात्री सापळा लावला होता. यात मोहाडी पोलिस ठाण्याचे तिन कर्मचारी आता अडकले आहेत. पोलिस काँन्स्टेबल बिपीन पाटील , सुरेंद्र खांडेकर व इस्माईल शेख या कर्मचा-यांनी मध्यरात्री नंतर गाडया अडवण्यास सुरुवात केली असता, या घटनेचे चित्रीकरण करुन अज्ञात व्यक्तीने  पोलिस अधिका-यांना ही माहिती दिली होती.
पोलिस अधिक्षक पंडीत यांनी चौकशी करुन या तिनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महामार्गावर रात्री लाचखोरी करणा-या महाभागांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचा-यांना देखिल नियंत्रण कक्षात तैनात करण्यात आले आहे.