Fri, Jun 05, 2020 04:33होमपेज › Nashik › मनपा परिचारिकांना २७ लाखांचा गंडा

मनपा परिचारिकांना २७ लाखांचा गंडा

Published On: Mar 23 2019 1:15AM | Last Updated: Mar 23 2019 1:15AM
इंदिरानगर : वार्ताहर 

नाशिक महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य सेवा केंद्रामध्ये कंत्राटी तत्त्वावर  कार्यरत असलेल्या परिचारिकांना नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून सुमारे 25 ते 26 महिलांकडून 27 लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिचारिका मीना सोनवणे-कदम (रा. ओमकार रो-हाउस, वासननगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या 2007 साली महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये कंत्राटी तत्त्वावर परिचारिका म्हणून नोकरीस लागल्या होत्या. तसेच त्यांच्यासोबत सारिका काळे, उज्ज्वला वेताळ, नंदा कोल्हे, लता बार्‍हे, अनिता जोगी, आरती साळवे, तबस्सूम शेख, मंजुळा भोये, भागाबाई पवार, सुनीता भोये, पल्लवी शिंदे, उर्मिला तुंगार, कविता बोडके, सोनाली निकम, रूपाली सदावर्ते, सुरेखा कडाळे, आशा देवरे, चंद्रकला बागूल, उषा निकम, पल्लवी उपळेकर, कविता ठाकरे, चंद्रकला गावित, छाया वानखेडे, स्मिता वझरे, नकुल डापके, रूपाली बारी आदी 25 ते 26 महिलादेखील नोकरीस लागल्या होत्या. सर्व परिचारिकांना मिळणारे मानधन अत्यंत कमी व नोकरीत कायम नसल्याने त्यांनी मनपा सेवेत कायम होण्यासाठी आरोग्य मंत्रालयापासून अनेक ठिकाणी प्रयत्न केले. याचदरम्यान, परिचारिकांच्याच ग्रुपमधील छाया दीपक सपकाळ (रा. राजीवनगर, इंदिरानगर) व माधुरी अनिल ठाकरे (रा. दसक, जेलरोड) यांनी मीना सोनवणे व इतर परिचारिकांची दीपक सपकाळ व अनिल ठाकरे यांच्याशी ओळख करून दिली.

त्यानंतर या संशयितांनी सर्वजणींना नोकरीत कायम करण्याची ऑर्डर मुंबई येथून आणण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी सर्व महिलांना विश्‍वासात घेतल्याने या महिलांनी कुणी दागिने विकून, तर कुणी कर्ज काढून 2014 ते 2015 या कालावधीत प्रत्येकी दीड लाख रुपये संशयितांना पैसे दिले. मात्र, दोन वर्षे होऊनही नोकरीत कायम होण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने  विचारणा केली असता दीपक सपकाळ व अनिल ठाकरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एप्रिल 2018 मध्ये महापालिकेचा करार संपल्याने या सर्व परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे नोकरीबरोेबरच पैसेही गेल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता नगरसेविकेच्या पतीने मध्यस्थी करून  महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने याबाबत फसवणूक झाल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश दांडगे अधिक तपास करीत आहेत.