Wed, Jun 03, 2020 09:43होमपेज › Nashik › जळगावला चोरीचे 25 लाखांचे बूट जप्त

जळगावला चोरीचे 25 लाखांचे बूट जप्त

Published On: Aug 30 2019 1:41AM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM
जळगाव : प्रतिनिधी

93 लाख रुपये किमतीचे बाटा कंपनीचे बूट घेवून निघालेल्या कंटेनर चालकाने रस्त्यातच जळगाव जिल्ह्यातील काही आरोपींच्या संगनमताने या बुटांची विल्हेवाट लावली. या प्रकरणी फरिदाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणा गुन्हे शोधपथकाने तपासाची सूत्रे फिरवत कंटेनर चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने काही माल पाळधी दूरक्षेत्रातील पराड गावात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक पराडमध्ये धडकले. यावेळी सुमारे 25 लाख रुपये किमतीचे महागडे बूट जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत विजयकुमार औमदत्त (फरिदाबाद) यांनी कंटेनरचालक तयूब उर्फ बदलु (रा.शेरगड) यास 93 लाख रुपये किमतीचे बाटा कंपनीचे बूट फरिदाबादहून चेन्नईत पाठवण्यासाठी कंटेनरमध्ये दिले होते. कंटेनर नियोजित स्थळी न पोहोचल्यानंतर औमदत्त यांनी फरिदाबाद (हरियाणा) पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर हरियाणा गुन्हे शोधपथकाने तपासाची सूत्रे फिरवत कंटेनर चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संशयित आरोपीने जामनेर येथील आरोपीच्या मदतीने पराड येथे एका जागी काही माल उतरवल्याची कबुली दिल्यानंतर पथक पाळधी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड व हवालदार अरुण निकुंभ, विजय चौधरी, महिला कर्मचारी हिवराडे यांना पथकासोबत रवाना केल्यानंतर पराड येथून सुमारे 25 लाखांचे बूट जप्त करून ते ट्रकमध्ये भरून सोबत नेले.