Tue, Nov 19, 2019 06:27होमपेज › Nashik › धुळे : बंदुकीचा धाक दाखवून २५ हजार लुटले

धुळे : बंदुकीचा धाक दाखवून २५ हजार लुटले

Published On: Jun 16 2019 3:38PM | Last Updated: Jun 16 2019 3:38PM
धुळे : प्रतिनिधी 

धुळे शहरातील 80 फुटी रोड वरील गॅस वितरण कार्यालयात बंदुकीचा धाक दाखवून 25 हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली. याच घटनास्थळापासून काही अंतरावर व्यापाऱ्यांचा डोळ्यात मिरचीची पूड फेकून रोकड लांबवल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आज सशस्त्र दरोडा पडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धुळ्यात 80 फुटी रोडवर एकलव्य गॅस एजन्सी आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका अल्टोकार मधून आलेल्या 4 जणांनी रखवालदाराला पिस्तूलाचा धाक दाखवून दुकानात प्रवेश केला. यानंतर कपाटातून रोकड काढून चोरांनी पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असता त्याने अग्रसेन चौका पर्यंतचा रस्ता दाखवला. यावरून चोरटे हे मालेगावकडे पळाली असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस उप विभागीय अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक आहेर यांनी तपासासाठी भेट देऊन माहिती गोळा केली आहे

दरम्यान याच दुकानापासून मधूबन कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लूट झाली आहे. तर गेल्या आठवड्यात नरडाना गावाजवळ रखवलंदाराचा खून करून सुमारे 2 लाख लंपास झाले. या मारेकऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. याच गावात हुस्नोद्दीन शेख यांना हात व पाय बांधून विहिरीत टाकून दिले होते. या खुनाचा देखील तपास लागला नाही. त्यामुळे नरडाना पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यासारख्या अनेक घटनांवरून नरडाना व संबंधित पोलिस करतात काय, असा प्रश्न उपस्‍थित होतो आहे.