Fri, Jun 05, 2020 06:10होमपेज › Nashik › बलात्‍कार प्रकरणात हलगर्जीपणा, दोन बीट मार्शल निलंबित  

बलात्‍कार प्रकरणात हलगर्जीपणा, दोन बीट मार्शल निलंबित 

Published On: Apr 03 2019 10:42PM | Last Updated: Apr 03 2019 11:11PM
पंचवटी (जि. नाशिक) : प्रतिनिधी

महिलेचे अपहरण केल्‍यानंतर महिलेसह संशयीत आढल्‍यानंतर त्‍यांच्याकडून पैसे घेवून त्‍यांना सोडून दिल्‍या प्रकरणी बीट मार्शलसह एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बीट मार्शल कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी निलंबीत करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बीट मार्शल कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे यांनी संशयितांना पीडित महिलेबरोबर शरदचंद्र मार्केट यार्डात पकडले होते. मात्र, दोघांनी प्रत्येकी चारशे रुपयांची चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याचे तपासात समोर आले होते. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्वतः या बिट मार्शल यांची चौकशी केली. त्यामध्ये पैसे घेतले असल्याचे कबूल केल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोघा बिट मार्शल यांना निलंबित करण्यात आले.

पंचवटीतील कर्णनगर येथील पीडित महिला सोमवार दि १ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता किराणा दुकानातून तांदूळ घेऊन घरी जात असताना संशयित आरोपी कल्याण उर्फ बाळु नारायण तायडे  (वय, २४ रा. साईछाया अपार्टमेंट हनुमाननगर) नावाच्या रिक्षाचालकाने आणि त्याचा मित्र संशयित दिगंबर उर्फ काळ्या विठोबा कुंदे  (वय, १९ रा विठाई नगर, अश्वमेघ नगर पेठरोड)यांनी पतीला मारण्याची धमकी देऊन तिला बळजबरीने रिक्षात बसवले व प्रथम पेठरोडला मार्केट यार्डात व त्यानंतर मखमलाबाद येथील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन पुन्हा बलात्कार केल्याची संताप जनक घटना घडली होती.

याबाबत महिलेच्या नातलगांनी ती हरविल्याची तक्रार रात्री एकच्या सुमारास पंचवटी पोलिस ठाण्यात दिली होती. इकडे संशयितांनी रात्रीपासून पहाटेपर्यंत सामूहिक बलात्कार करून महिलेला पहाटे ४ वाजता कर्णनगर येथे आणून सोडून दिले होते. यावेळी तिची अवस्था फारच बिकट झालेली होती. घडलेला सर्व प्रकार तिने कुटुंबीयांनी सांगितला. कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पंचवटी पोलिसात तक्रार दिली. मात्र, सहायक पोलिस निरीक्षकांनी महिला सापडल्याने हरविल्याची तक्रार निकाली काढत घरी जाण्यास सांगितले. यावर महिलेच्या नातेवाइकांनी रात्रभर तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगताच ‘हा तुमचा कौटुंबिक वाद असून घरी जाऊन मिटवा’, असे पोलिसांनी सांगितले. यावर नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. याबाबत पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर आणि एका अधिकार्‍याने पुढाकार घेतल्याने गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर रात्री  पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची चौकशी केली. चौकशी करताना पीडित महिला आदिवासी समाजाची असल्याने संशयितांविरोधात अट्रासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पंचवटी पोलिसांनी दिवसभर संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून, घटनेत वापरण्यात आलेली रिक्षा (क्रमांक एम एच १५ एफ यु ३२७४) देखील जप्त करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर करीत आहेत.