Tue, Mar 09, 2021 15:55
जळगाव : निवडणुकीच्या वादातून २ गटात तुफान हाणामारी, २८ जणांवर परस्परविरोधी गुन्हा 

Last Updated: Jan 20 2021 8:15AM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

चाळीसगाव तालुक्यातील लांबेवडगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या यांचा सर्रास वापर करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटातील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १८ रोजी घडली. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी परस्परांच्या विरोधात मेहूणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका गटाच्या विरोधात २३ तर दुसऱ्या गटाच्या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहूणबारे पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, गावात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी भेट दिली.

याबाबत माहिती अशी की, लांबे वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत फिर्यादी प्रकाश निळकंठ पाटील यांचे पॅनल विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे गावकरी औक्षण करणार होते. यावेळी संशयित आरोपींनी हातात तलवार, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन एकत्र आले. यातील संशयित संतोष पाटील याने लोखंडी रॉड प्रकाश पाटील यांच्या डोक्यात व उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली तर सोमसिंग पाटील याने कोमलसिंग रामसिंग पाटील यांच्या डोक्यात तलवार मारून गंभीर दुखापत केली. तर दोघांनी कोमलसिंग पाटील यांच्या अंगावर लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. इतर आरोपींनी हातातील लोखंडी रॉड व काठ्यांनी साक्षीदार यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देवून अश्लिल शिवीगाळ केली. यांनी जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे व प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या नोटीसमधील सूचनेचे उल्लंघन करत मारहाण केली.

याप्रकरणी प्रकाश निळकंठ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, मंगलसिंग पाटील, मानसिंग पाटील, संजय पाटील, अमरसिंग पाटील, केतनसिंग पाटील,भगवान पाटील, सुमेरसिंग पाटील, हेमंत पाटील, निलेश पाटील, विजयसिंग पाटील, अरूण पाटील, लखनसिंग पाटील, कुणाल पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, रविंद्र पाटील, भूषण पाटील, बिजेसिंग पाटील, अजय पाटील,देवराज पाटील यांच्या विरोधात मेहूणबारे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

९ जणांना अटक

दरम्यान या गुन्ह्यातील गंभीर जखमी कोमलसिंग पाटील यांना चाळीसगाव शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या गुन्ह्यातील २३ पैकी ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले हे करीत आहेत.