Wed, Jun 03, 2020 20:29होमपेज › Nashik › १८ लाखांचा गुटखा ठाणगाव येथे पकडला

१८ लाखांचा गुटखा ठाणगाव येथे पकडला

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:50PMसिन्‍नर : प्रतिनिधी

ठाणगाव शिवारात रविवारी (दि.11) पहाटे तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटख्याचा मालट्रक पोलिसांनी पकडला. मालट्रकमधील तब्बल अठरा लाखांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला.
ठाणगाव-केळी रस्त्यावरून गुटख्याची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन मंडलिक आणि पोलीस नाईक बाबा पगारे यांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस नाईक बाबा पगारे, भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, शहाजी शिंदे आदींनी ठाणगाव शिवारात सापळा रचला.

मध्यरात्री ठाणगाव  शिवारातून जाणारा  मालट्रक (एचआर 38, एक्स 1236) पोलिसांनी थांबविला. मालट्रक चालक  कल्लू बगेल (26, रा. कांधी, ता. जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळवल्याने त्यांनी मालट्रकची तपासणी केली. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मालट्रकच्या सुरूवातीला काही स्पोटर्स शूजचे पोते लावण्यात आले होते.

पोलिसांनी मालट्रकची संपूर्ण तपासणी केली असताना त्यांना वॉव (डब्लूओडब्लू) नावाच्या गुटख्याचे तब्बल 59 पोती आढळून आली. एका पोत्याची किंमत साधारणत: तीस हजार रुपये असून, एकूण 17 लाख 70 हजारांचा गुटख्यासह मालट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणून ताब्यात घेतला. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.