Fri, May 29, 2020 09:26होमपेज › Nashik › पोस्ट बँकांमध्ये १४ हजार खाती 

पोस्ट बँकांमध्ये १४ हजार खाती 

Published On: Jul 14 2019 2:24AM | Last Updated: Jul 14 2019 12:28AM
नाशिक : धनंजय बोडके

गत सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेच्या खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात 650 बँक शाखांतील बचत खातेधारकांची संख्या 14 हजारांवर पोहचली असल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली. बचत खात्यांमध्ये राज्यांत नाशिकचा आघाडीच्या जिल्ह्यामध्ये क्रमांक लागतो.

बदलत्या तंत्रज्ञान मार्गाचा अवलंब करण्यास शासनाचे विविध विभागात आघाडीवर आहेत. त्यात डाक विभागाचाही समावेश आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पोस्टल बँकेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. बँकेच्या बचत खात्यामधून पोस्टाच्या आरडी, सुकन्या योजना, पीपीएफ, इतर बँकांसह सर्वत्र ऑनलाइन व्यवहार करता येत असल्याने वेळेचीही बचत होत आहे. पोस्ट बँकिंग सेवेत बचतखाते, रिकरिंग डिपॉझिट, टाइम डिपॉझिट अकाउंट, मनी इन्कम स्किम, सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्किम आदी सुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये होणारी गर्दी बघता  पोस्ट कार्यालयाने देखील सप्टेंबर 2018 मध्ये पोस्ट बँक सुरू केली आहे. या बँकेला अजून वर्षदेखील झाले नसून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जून 2018 अखेरपर्यंत बँकेचे 14 हजार खातेधारक झाले आहेत. जिल्ह्यात टपाल कार्यालयाचे दोन विभाग असून, त्यात नाशिक आणि मालेगावचा समावेश आहे. नाशिकमध्ये  350 आणि मालेगावमध्ये 300 पोस्ट बँकांच्या शाखेद्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येत असल्याचे अहिरराव यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्याजदरापेक्षा पोस्टाच्या योजनांमध्ये जादा व्याजदर असल्यामुळे या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 ठराविक रकमेचे बंधन नाही 

बचत खात्यांमध्ये ठराविक रक्‍कम ठेवावी, असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे  बँकेच्या बचत खात्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर करंट अकाउंटलाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. आरडीसह इतर योजनांमधील रक्कम खातेधारकाला त्याच्या नावावर वर्ग करण्यासाठी  पोस्ट खात्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग करणे बंधनकारक असल्यामुळे देखील खात्यांच्या संख्येत वाढ होत आहे.