Fri, Jul 10, 2020 09:24होमपेज › Nashik › धुळे : बसचा भीषण अपघात; १३ ठार, २४ गंभीर जखमी

धुळे जिल्ह्यात बस-कंटेनर अपघातात 13 जण ठार

Published On: Aug 19 2019 8:21AM | Last Updated: Aug 19 2019 3:45PM
धुळे : प्रतिनिधी

औरंगाबादकडून शहाद्याकडे जाणार्‍या परिवहन महामंडळाच्या बसला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवासी ठार, तर 24 जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.  मृताच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

रविवारी रात्री औरंगाबादककडून शहाद्याला जाणारी बस (एमएच 20 बीएल 3756) ही अकराच्या सुमारास दोंडाईचाजवळील निमगूळ गावानजीक पोहोचली. याचवेळी शहाद्याकडून भरधाव आलेला (एपी 29 व्ही 7576) कंटेनर हा बसचालकाच्या बाजूला धडकला. त्यामुळे चालकाच्या सीटपासून बसच्या मागील बाजूपर्यंतचा पत्रा कापला गेला. यात बसचालकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात होताच मोठा आवाज झाला. जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत  ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. 

पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निरीक्षक हेमंत पाटील, दोंडाईचा ठाण्याचे निरीक्षक पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी बसमधील जखमींना दोंडाईचा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 9 पुरुष, 3 महिला व एका मुलाचा समावेश आहे. बसचालक मुकेश नगीन पाटील (40, रा. शहादा), शकील मोहम्मद बागवान (रा. शहादा), प्रेरणा श्रीराम वंजारी (रा. शहादा), इद्रिस नासीर मन्यार (रा. तळोदा), हस्तीक आनंद वाघचौरे (रा. ठाणे), वृषाली दीपक भावसार (रा. शहादा), संजय ताराचंद अलकारी (रा. शिरुड, ता. शहादा), सौरभ श्रीराम वंजारी (रा. शहादा), मनीषा महेंद्र बागल (40, रा. निमगूळ, ता. शिंदखेडा), तेजस जगदीश भावसार (14, रा. शहादा), सुयोग बन्सीलाल नाहाटा (रा. शहादा), सोमनाथ धोंडू पाटील (रा. चाळीसगाव) व कंटेनरचा चालक संतोष काशीनाथ ठोंबरे (रा. टुणकी, ता. वैजापूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. अपघातामध्ये 24 जण जखमी झाले आहेत.