Tue, May 26, 2020 12:14होमपेज › Nashik › युती आणि आघाडी धर्मावरच मदार

नाशिक : युती आणि आघाडी धर्मावरच मदार

Published On: Apr 02 2019 2:00AM | Last Updated: Apr 02 2019 2:00AM
ज्ञानेश्‍वर वाघ 

दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन आजी-माजी खासदार पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही इच्छुक अपक्ष निवडणूक लढविणार असले तरी ही बाब दोघांसाठी फारशी कटकटीची ठरणार नाही. परंतु, आघाडी आणि युतीतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपापल्या उमेदवारामागे किती खंबीरपणे उभे राहतात, यावर उमेदवारांची संपूर्ण भिस्त राहील. आघाडी आणि युतीत अंतर्गत वाद आणि स्पर्धा नसल्याचे वरकरणी दिसत असले तरी अनेकांनी गुप्त मार्गाने आपापल्या परीने राजकारण करीत ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ अशी वाटचाल सुरू केली आहे. आता ही वाट सुपंथाची असेल की कुपंथाची हे निवडणुकीनंतर समोर येईलच. त्यात अंतर्गत वाद, नाराजी यामुळे दुखावलेले चेहरे युती आणि आघाडीचा धर्म कितपत पाळतात, यावरच उमेदवारांची मदार असेल. 

शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्यानंतर गोडसेंसाठी निवडणुकीचा मार्ग सोपा होईल, असे मध्यंतरी बोलले जात होते. परंतु, सद्य:स्थिती पाहिली तर दोघांसाठीही निवडणुकीचा मार्ग सोपा नाही. उमेदवारांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी केली होती. त्यावेळी समीर भुजबळ यांनी गोडसे यांना घरचा रस्ता दाखविला होता. त्यावेळी मनसेची ताकद कमी पडल्याने गोडसे यांना थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2014 मध्ये समीर भुजबळ यांच्याऐवजी छगन भुजबळ आखाड्यात उतरले. अर्थात, तो काळ ‘अँटी भुजबळ’ होता. यामुळे भुजबळांचा ऐतिहासिक पराभव करीत गोडसे यांनी समीर भुजबळांनी केलेल्या पराजयाचाही वचपा काढला. मात्र, तेव्हा गोडसे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून निवडणूक लढविली होती. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांचा झालेला निसटता पराभव हेरूनच शिवसेनेने गोडसे यांना आपल्या कंपूत समाविष्ट करून घेत ही जागा खिशात टाकली होती. आता पुन्हा भुजबळ आणि गोडसे समोरासमोर आले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात असले तरी जातीय समीकरणांवरच ही निवडणूक आधारित असेल, यात शंका नाही. 
 

भाजपच्या विरोधात भूमिका घ्या, असा सल्ला मनसैनिकांना देणार्‍या राज ठाकरे यांच्या भूमिकेचा या निवडणुकीत काय परिणाम होतो, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत मनसेचा वारू नाशिक शहर व जिल्ह्यात बर्‍यापैकी धावत होता. राज ठाकरे यांची क्रेझ असल्याने नाशिकमधील तिन्ही आमदारांबरोबरच नगरसेवकांचीही मोठी संख्या मनसेच्या खात्यात जमा झाली होती. परंतु, त्यानंतर मात्र नाशिककरांनी मनसेला नकारघंटाच दिली. अशा स्थितीत आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मनसेचा काय लाभ मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत याच राज ठाकरेंनी मोदींचा उदो उदो करीत छगन भुजबळ यांच्या मफलरपर्यंत हात घातला होता. मनसेच्या या दुटप्पी भूमिकेची नागरिकांमध्ये चर्चा आहे. महापालिकेत मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले, तेव्हा पहिल्या अडीच वर्षांत मनसेला भाजपची साथ लाभली. याच काळात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका-टिपण्णी केल्याने स्थानिक नेत्यांनी मनसेचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे महापालिकेतील सत्तेचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा मनसेच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून आली होती. शरद पवार यांच्या सूचनेनुसार भुजबळांनी फिल्डिंग लावून महापालिकेत शिवसेना-भाजपला विरोध म्हणून मनसेला पाठबळ दिले होते. कदाचित याची परतफेड म्हणूनदेखील मनसेकडून समीर भुजबळ यांना पाठिंबा देण्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसून येते. यामुळे नाही म्हटले तरी समीर भुजबळ यांची शहरातील ताकद वाढीस लागण्यास किंचित का होईना हातभार लागेल, हे नाकारून चालणार नाही. फक्त हा पाठिंबा देखाव्यापुरता ठरू नये म्हणजे झाले.

या मतदारसंघातून आणखी दोन उमेदवार इच्छुक होते. त्यांपैकी शिवसेनेच्या शिवाजी चुंभळे यांनी तत्काळ माघार घेत गोडसे यांना पाठिंबा दर्शविला आहे; तर माजी आमदार माणिक कोकाटे यांचा फैसला अद्याप बाकी आहे. त्यांचे मन वळविण्यात शिवसेना व भाजपला यश आले तर सिन्नरमधील मतांची विभागणी थांबू शकेल. अन्यथा गोडसे आणि कोकाटे यांच्यातील मतविभागणीचा फायदा भुजबळांना मिळू शकतो. त्यातही शिवसेना-भाजपत असे अनेक नाराज चेहरे आहेत की, ज्यांची युतीऐवजी आघाडीच्या उमेदवाराला मदत होऊ शकते. यापैकी अनेकजण शिवसेना-भाजपत मोठ्या पदांवर आहेत. परंतु, जात फॅक्टर पुढे आला तर संबंधितांचे नातेसंबंध प्रतिस्पर्ध्याच्या पथ्यावर पडू शकतात. दुसरीकडे आघाडीपैकी काँग्रेसमध्ये अजूनही शांतता पाहावयास मिळत आहे. काँग्रेसची संपूर्ण ताकद भुजबळ यांच्यामागे उभी राहिली नाही तर ही निवडणूक आघाडीलाही जड जाऊ शकते. आता युती आणि आघाडीचा धर्म कोण कसा पाळतो, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.