Fri, Jun 05, 2020 13:57होमपेज › Nashik › नंदुरबारमध्ये डेंग्यूचे २५ रूग्ण आढळले

नंदुरबारमध्ये डेंग्यूचे २५ रूग्ण आढळले

Last Updated: Oct 14 2019 4:08PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : प्रतिनिधी 

नंदुरबार शहरात दीड महिन्यापासून डेंग्यूसदृश तापाने थैमान घातलेले असून थंडी-तापाचे शेकडो रुग्ण खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही रूग्ण  अन्य शहरांमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत २५ हून अधिक जणांना डेंग्यू झाल्याचे रक्त तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. यामध्ये खासदार डॉक्टर हिना गावित या सुद्धा डेंग्यूसदृश तापाने आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असूनही आरोग्य यंत्रणा केवळ सर्वे करण्यासारख्या जुजबी उपायावर भर देत आहे.

नाशिक विभागाच्या आरोग्य संचालिका यांनी तातडीने दखल घेऊन या स्थितीची पाहणी करण्यासाठी आज सोमवार (दि. १४) रोजी नंदुरबार दौरा केला. नंदुरबार शहरातील डेंग्यूची  साथ ग्रस्त भागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. दरम्यान  नंदुरबार शहरात चाललेल्या साथीच्या थैमानामुळे आरोग्य यंत्रणांकडून नियमितपणे शहरात कुठेही औषध फवारणी केली जात नाही, ही बाब उघड झाली आहे. मलेरिया विभागाच्या आणि नंदुरबार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचे यामुळे वाभाडे निघाले आहे. तर नंदुरबार शहरात कधीही औषध फवारणी आणि धूर फवारणी झाल्याचे लोकांना पाहायला मिळालेले नाही. नगरपालिकेकडे मोठे धूर फवारणी मशीन  आहे. परंतु मागील दोन वर्षात हे मशीन कुठे फिरताना नागरिकांना दिसलेले नाही. 

नंदुरबार नगरपालिकेचा आरोग्य विभाग औषध फवारणी कामासाठी नेहमीच ठेकेदारावर विसंबून राहतो. तथापि संबंधित ठेकेदार वसाहतीमध्ये जाऊन औषध फवारणी करत आहे किंवा नाही याची कधीच तपासणी होत नाही. परिणामी औषधांवर शासनाकडून केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च कोणाच्या घशात जातोय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहराच्या प्रत्येक वसाहतीत नियमित फवारणी व्हावी यासाठी मलेरिया विभागाकडून सातत्याने नगरपालिकेला औषध पुरवठा  दिला जातो असा दावा मलेरिया विभागाकडून करण्यात आला आहे. असे असताना शहरात पसरलेली डेंग्यूसदृश तापाची साथ आणि किडयांचे वाढलेले थैमान शहरात कुठेही औषध फवारणी होत नसल्याचे उघड करीत आहे. परिणामी नंदुरबार शहरात डेंग्यूसदृश तापाची साथ वेगाने पसरत आहे. शेकडो रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. असे असून सुद्धा नंदुरबार नगरपालिकेचा आरोग्य विभाग, मलेरिया नियंत्रित करणारे जिल्हा कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभाग अत्यंत जुजबी उपाय करताना  दिसत आहे. तापाचे रुग्ण आढळलेल्या भागापुरती औषध फवारणी करण्यात येत आहे. परंतु अन्य वसाहतीकडे प्रशासनाचे अजूनही दुर्लक्षच होताना दिसत आहे.

मलेरिया विभागाने आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ३६८ रुग्णांच्या रक्त चाचण्या घेतल्या. त्यातील २२ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाल्याचा अहवाल आला आहे. मागील दहा दिवसात यात आणखी काही रुग्णांची भर पडली आहे. खासगी रुग्णालयातील ९२ रुग्णांच्या अहवालातून डेंग्यूसदृश ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरिया अधिकारी डॉक्टर ढोले यांनी सांगितले की, 'नंदुरबार शहरात आरोग्य सेविका अशा वर्कर यांची पथके सर्वेक्षणासाठी कार्यरत करण्यात आले आहेत. घरात साठवून ठेवल्या जाणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळेच डेंग्यू होत असल्यामुळे नागरिकांचे त्याविषयी प्रबोधन केले जात आहे.'