Thu, Jul 16, 2020 09:39होमपेज › Nashik › नाशिकमधील साडेतीन हजार एचएएल कर्मचारी संपावर 

नाशिकमधील साडेतीन हजार एचएएल कर्मचारी संपावर 

Last Updated: Oct 14 2019 3:10PM

नाशिक : एचएएल  कर्मचार्‍यांच्या देशव्यापी बेमुदत संपाला सुरवात ओझर :  वार्ताहर 

नाशिक विभागातील सुमारे ३५०० आणि देशभरातील एकूण ९ प्रभागातील जवळपास 20 हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाशी अंतिम बोलणी फिस्कटल्याने एच. ए. एल. कामगारांनी बेमुदत संपाला सुरवात केली. आज (ता.14) सकाळीच कामगारांनी एच. ए. एल.च्या मुख्य प्रवेशद्वारासह कारखान्यात जाणाऱ्या तीनही गेटवर खडा पहारा देत आंदोलनाला सुरवात केली. यावेळी कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बंगळूर येथे झालेल्या बैठकीची बोलणी फिस्कटली असून समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एच.ए.एल. कामगार ट्रेड यूनियन समितीच्या वतीने बैठकिचा त्याग केला आहे.

व्यवस्थापन कामगार वर्गाची पिळवणूक करत असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. गेली ३४ महिने अधिकारी वर्ग वाढीव पगार वाढीचा लाभ घेत असून फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासुन दूर ठेवण्याचे काम एच.ए.एल. उच्च व्यवस्थापन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रलंबित वेतन कराराच्या बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगार वर्गाला हक्काची रास्त वेतन वाढ द्यावी या मागणीसाठी ऑल इंडिया एच.ए.एल. को-ऑर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून एच. ए. एल.  कर्मचारी व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत. 

व्यवस्थापनाने चांगला वेतन करार देण्याच्या आश्वासन  5 वर्ष  मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व संघटना 10 वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतर ही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला 35% ईतकी वाढ दिलेली असतांना कामगार वर्गाला तुटपुंजी फक्त 8% वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिला असल्याचे समजते.

वाढीव पगारवाढीचे फरक पूर्ण मिळून, वाढीव पगारवाढीचा लाभ अधिकारी वर्ग गेली 34 महिने घेत असून कामगार वर्गाला जाचक अटी टाकून तुटपूंजी वाढ दिली आहे. यामुळे व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीबद्दल तीव्र असंतोष, नाराजी  पसरल्याचे चित्र सध्या आहे.

चर्चेच्‍या अनेक फेऱ्या होऊन ही कामगाराना सन्मानजनक प्रस्ताव मिळत नसल्याने को-ऑर्डिनेशन कमिटीने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित केले आहे. लखननौ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापनाकडून वेळकाढू आणि आडमुठे धोरण घेतल जात आहे. आंदोलनाचे सर्व पर्याय वापरल्यानंतर ही जर व्यवस्थापन सकारात्मक भूमिका घेत नसेल तर बेमुदत संपाशिवाय दुसरा पर्याय नाही.  या बेमुदत संपास केवळ व्यवस्थापनाची कामगार वर्गाला दिली जाणारी सापत्न वागणूक कारणीभूत असल्याचे  मत मांडण्यात आले आहे. अधिकारी वर्गाच्या तुलनेत अतिशय तुटपूंजी वाढ व्यवस्थापन देऊ करत असल्याचे मत को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने मांडण्यात आले.

आस्थापनेप्रती कामगार प्रामाणिक असून जर कंपनी आर्थिक संकटात असेल तर अधिकारी वर्गाला दिलेली 1 जानेवारी 2017 पासून दिलेली वेतनवाढ बंद करावी. तसेच आर्थिक स्थिति उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगार वर्गाची सोबत वेतनवाढ करावी अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे. परंतु कंपनीची आर्थिक स्थिति उत्तम असून केवळ कामगार वर्गाच्या रास्त मागणी वर व्यवस्थापन गदा आणत आहे.

बोलणी फिस्कटल्यामुळे अखिल भारतीय एच.ए.एल. कामगार ट्रेड यूनियन समितीच्या वतीने जाहिर केलेल्या पत्रकानुसार पूर्व नियोजित बेमुदत संपाला आजपासून सुरवात झाली. यावेळी एच. ए. एल. कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे, पदाधिकारी प्रविण तिदमे, दिपक कदम, जितु जाधव, अनिल मंडलिक, संजय कुटे, पवन आहेर अशोक गावंडे , मनोज भामरे, आनंद बोरसे, योगेश ठुबे, संतोष पोकळे, सचिन दीक्षित, मिलिंद निकम, रमेश कदम,सुनील जुमळे, सागर कदम, नवनाथ मुसळे, स्वप्निल तिजोरे, चेतन घुले, संतोष आहेर, मन्सूर शेख, प्रमिला पवार, संदीप कुटे, मंगेश थेटे, राजेंद्र मोरे, नितिन पगारे, राजशेखर जाधव, सचिन धोंडगे, योगेश अहिरे, अनिल गवळी, नितिन पाटील, नंदकुमार चव्हाण, सुशिल सातपुते, शिवाजी पोटे, हेमंत अहिरराव, चिंतामण थिटे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.