Wed, Jun 03, 2020 09:30होमपेज › Nashik › सोमेश्वर धबधब्याचा आनंद लुटण्‍यासाठी नाशिककरांची गर्दी(video)

सोमेश्वर धबधब्याचा आनंद लुटण्‍यासाठी नाशिककरांची गर्दी(video)

Published On: Jul 29 2019 2:11PM | Last Updated: Jul 29 2019 2:56PM

फोटो. सोमेश्वर धबधब्याचा आनंद लुटण्‍यासाठी नाशिककरांची गर्दी केली आहे. नाशिक : प्रतिनिधी

खळाळून वाहणार्‍या धबधब्याचे कोसळणारे तुषार अंगावर झेलत, अधूनमधून येणारी पावसाची सर आणि सोबतीला भाजलेले मक्याचे कणीस आणि वाफाळता चहा अशा बेधुंद वातावरणात नाशिककरांनी सोमवारी (दि. 29) सकाळपासून सोमेश्वर धबधब्याकाठी आनंद लुटला.

गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या संततधारेमुळे गोदावरी प्रवाहित झाली आहे. पाण्याअभावी गेल्या काही दिवसांपासून कोरडाठाक पडलेला सोमेश्वर धबधबा देखील खळाळून वाहत आहे. रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी कुटुंबीयांसोबत सोमेश्वरधबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती. सलग दुसर्‍या दिवशी म्हणजेचे सोमवारी (दि.29) उत्साह कायम असल्याचे चित्र पहायला मिळाला. सकाळपासून युवावर्गासह नागरिकांनी धबधबच्या परिसरात गर्दी केली. यावेळी उपस्थितांना सेल्फी काढण्याचा मोह टाळता आला नाही. धबधबा परिसर दिवसभर गर्दीने फुलून गेला. तर काही जणांनी सोमेश्वर मंदिर परिसरात नौकायनाचा आनंद लुटला. दरम्यान, पर्यटकांच्या गर्दीने स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

सुरक्षा ऐरणीवर

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस विभागाने सोमेश्वर धबधब्याचा परिसर नो-सेल्फी झोन म्हणून जाहीर केला आहे. मात्र यावेळी काही उत्साही नागरिकांनी जीव धोक्यात घालून पाण्यात मोबाइलमध्ये सेल्फी कैद करत होते. त्यामुळे परिसरात कोणतीच सुरक्षाव्यवस्था तैनात केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.