Wed, Jun 03, 2020 21:59होमपेज › Nashik › खामगाव पाटी येथील खुनाचा २४ तासात छ्डा

खामगाव पाटी येथील खुनाचा २४ तासात छ्डा

Published On: Mar 28 2019 8:11PM | Last Updated: Mar 28 2019 8:11PM
येवला : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे वॉचमनचा खून व डंपर चोरी प्रकरणाचा छ्डा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात लावत चोरी गेलेला डंपर व संशयितांना ताब्यात घेतले.

बुधवार दि. २७ रोजी मध्यरात्रीचे सुमारास खामगाव शिवारात गाडे पाटील खडी क्रेशर साईटवर तुळशीराम मोतीराम सुरासे (वय ५५, रा. खामगाव ता. येवला ) हे रात्रपाळीच्या ड्युटीस वॉचमन म्हणून पहारा देत होते. दरम्यान सदर ठिकाणावर अज्ञात ५ ते ६ इसमांनी जबर दरोडा टाकला. यावेळी  वॉचमन तुळशीराम सुरासे यांना गंभीर दुखापत करुन त्यांचे हातपाय बांधले व साईटवर असलेला १० चाकी हायवा ट्रक (क्र. एम. एच. १४ बी. जे. ३०५४५) पळवून नेला. या घटनेत वॉचमन तुळशीराम सुरासे यांचा झालेल्या मारहाणीत जागेवरच मृत्यू झाला. या बाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल, मनमाड उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक आर. रागसुधा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच मयत इसम तुळशीराम सुरासे यांचे अज्ञात मारेकर्‍यांच्या शोधार्थ लगतचे जिल्ह्यात तात्काळ तपासपथके रवाना केली. 

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव येथे सापळा रचून कोपरगाव तालुक्यातील संशयीत अजय मारोती निकम (वय ३०, रा. शिरसगाव, ता. कोपरगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्‍वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या साथीदार नाव सांगितले. आकाश रंगनाथ लोखंडे (रा. कोकमठाण ता. कोपरगाव) अमोल पानसरे (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) सचिन खालकर (रा. तळेगाव, ता. संगमनेर) संदीप गायके (रा. इंदिरानगर, कोपरगाव) मनोज छगन भागवत (रा. सावळगाव, ता. कोपरगाव) यांच्यासोबत वरील गुन्हा केल्याची कबुली निकम याने दिली. 

यातील आरोपीचा साथीदार आकाश रंगनाथ लोखंडे (वय २५, रा. कोकमठाण ता. कोपरगाव) यास कोपरगाव शहरातुन ताब्यात घेण्यात आले.  आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली कार तसेच जबरीने लुटमार करुन नेलेला १० चाकी  ट्रक (एम. एच. १४ बी. जे. ३०५५) असा एकूण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या  गुन्ह्यातील आरोपींचे इतर साथीदारांचा स्थानीक गुन्हे शाखा पथक शोध घेत असून त्यांच्याकडून अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे,  पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, पोलिस उपनिरीक्षक संदीप कहाळे, पोलिस उपनिरीक्षक अरुण पगारे, रवि शिलावट, रवींद्र वानखेडे, रावसाहेब कांबळे, भरत कांदळकर, राजु सांगळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, संदीप हांडगे, हेमंत गिलबिले, इम्रान पटेल, विशाल आव्हाड, संदीप लगड, मंगेश गोसावी, हरिष आव्हाड, गिरीष बागुल,  योगेश गुमलाडू यांचे पथकाने २४ तासाचे आत या गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.