Tue, Jun 02, 2020 23:41होमपेज › Nashik › भाजपबरोबरच काँग्रेसलाही मतविभागणी होण्याची चिंता !

भाजपबरोबरच काँग्रेसलाही मतविभागणी होण्याची चिंता !

Published On: Apr 27 2019 2:00AM | Last Updated: Apr 26 2019 7:31PM
यशवंत हरणे

शिवसेना व भाजप यांच्यात युती झाली असली तरी धुळ्यामध्ये मात्र अद्यापही मनोमीलन झालेले नाही. त्यामुळे भाजपची अशी अवस्था असतानाच काँग्रेस उमेदवारालाही मतविभागणीचा धोका सतावत आहे.

येथे भाजपने संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली असतानाच आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष म्हणून उडी घेऊन भाजपची डोकेदुखी वाढवली आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीतर्फे नबी अहमद तर बसपा, समाजवादी पार्टीकडून माजी पोलिस अधिकारी डॉ. संजय अपरांती हे रिंगणात उतरले आहेत.

डॉ. भामरे रिंगणात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. आचारसंहितेपूर्वी धुळे येथे आणि गेल्या आठवड्यात नंदुरबारला झालेली नरेंद्र मोदी यांची सभा पाहता भाजप नेत्यांची प्रतिष्ठा येथे चांगलीस पणास लागली आहे. तथापि, सेनेचा भामरे यांना विरोध कायम आहे. हा विरोध शमविण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असला तरी त्याला यश आलेले नाही. दुसरीकडे अनिल गोटे हेदेखील भामरेंविरोधात दंड थोपटून उभे आहेत. गोटे यांच्या उमेदवारीने मोठे नुकसान होणार नसल्याचा दावा भाजपकडून होत असला तरी त्यांनी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत घेतलेली 54 हजार, तर विधानसभेत घेतलेली 74 हजार मते नजरेआड करून चालणार नाही. मालेगाव मध्यसह धुळे ग्रामीण, सटाणा आणि मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसची मदार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्यमधून काँग्रेसला एक लाख 33 हजार मते मिळाली होती. तर भाजपला अवघी 5 हजार 786 मते मिळाली होती. पण, भाजपने अन्य पाच मतदारसंघांतून  1 लाख 26 हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळीदेखील मालेगाव मध्यमधून अशाच प्रकारची आघाडी घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण, आता वंचित आघाडीने नबी अहमद तर सपा-बसपाकडून सेवानिवृत्त पोलिस अधिकारी डॉ. संजय अपरांती यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मत विभाजनाची चिंता सतावत आहे. याचा फायदा नेमका कुणाला होणार, याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून आहे.