Fri, Jun 05, 2020 14:27होमपेज › Nashik › नाशिक : भाजप आमदार सीमा हिरे व नगरसेवक शहाणे यांच्यात खडाजंगी

नाशिक : भाजप आमदार सीमा हिरे व नगरसेवक शहाणे यांच्यात खडाजंगी

Published On: Apr 11 2019 7:13PM | Last Updated: Apr 11 2019 6:44PM
सिडको : प्रतिनिधी

अमळनेर येथे भाजपच्या सभेतील हाणामारी प्रकरण ताजे असताना सिडको भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. माझ्या प्रभागात प्रचार करताना मला निमंत्रण दिले नाही. या कारणावरुन सिडकोतील उत्तम नगर भागात भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे व भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यात रस्त्यावर जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यांच्यातील धुसफूस ऐन प्रचारात चव्हाट्यावर आली.

भाजप आणि शिवसेनेचे मनोमिलन झाले असले, तरी अनेक दिवसांपासून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात सुरु असलेली धुसफूस आज ऐन प्रचारावेळी नागरिकांसमोर आली. भागात प्रचाराला येवूनसुद्धा नगरसेवकांना फोन केला जात नसल्याचा आरोप करून नगरसेवक शहाणे यांनी वादविवाद केला. या दोघांमध्येच खडाजंगी झाल्याने एकाच पक्षाच्या आमदार आणि नगरसेवकांमध्येच समन्वय नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र प्रचार सुरु केला आहे. गुरुवारी (दि. ११) रोजी उत्तमनगर येथे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु होता.

यावेळी या प्रभाग २९ मधील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी नगरसेवक शहाणे यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट उत्तमनगर येथील बुद्धविहार परिसरात जावून भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चकोर यांच्याकडे मला का फोन केला म्हणून विचारणा केली. आमच्या प्रभागात येवून प्रचार करतांना आम्हालाच विश्वासात का धेतले जात नाही असे म्हणून चकोर यांच्याकडे विचारणा केली. यावेळी  हिरे यांनी शहाणे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र या चर्चेतून हा वाद विकोपाला जावून दोघांमध्ये खडांजंगी झाली.

चारानिमित्‍त दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांसमोरच आमदार आणि नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. अखेरीस काही जणांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. 
माझ्या प्रभागात येवून प्रचार करत असतांना नगरसेवक या नात्याने पदाधिकार्‍यांनी कळविले पाहिजे होते. मात्र मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याचबरोबर मी या प्रभागाची जबाबदारी असणार्यां पदाधिकार्‍यांकडे विचारणा करीत होतो. त्यावेळी आमदारांनी कारण नसतांना स्वतःवर ओढून घेवून वादविवाद केला. प्रभागाचा नगरसेवक म्हणून मला का बोलाविले नाही हीच विचारणा केली मात्र आमदारांनी हा वाद घातला. या घटनेची माहिती भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकारी व कोअर कमिटीकडे देऊन तक्रार केली आहे.
 मुकेश शहाणे, नगरसेवक 

सध्या संपूर्ण मतदार संघात घरोघर जावून प्रचाराचे काम सुरळीत सुरु आहे. मात्र काही विरोधकांनी ही अफवा पसरविली आहे. असा काही प्रकार घडलेलाच नाही. लोकांमधून चुकीचे गैरसमज पसरविण्याचे काम सुरु आहे. अफवा आहे असे काहीही झालेले नाही. प्रचाराबरोबरच इतरही काही बैठकांचे नियोजन सुरु आहे. 
आमदार सिमा हिरे