Sun, Sep 20, 2020 07:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केईएममध्ये कर्करोगाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

केईएममध्ये कर्करोगाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

Last Updated: Jul 09 2020 3:14PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कर्करोगावर उपचार सुरू असलेल्या तरुणाने आजारपणाला कंटाळून केईएम रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या रुग्णाचे नाव शहाजी खरात (वय २०) असून या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शहाजी चेंबूरच्या न्यू भारत नगर परिसरातील महालक्ष्मी वेल्फर सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहात होता. दरम्यान त्याला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्रास वाढल्याने अखेर जूनमध्ये त्याला उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. 

केईएममध्ये शहाजीवर वार्ड नंबर ११ मध्ये उपचार सुरू होते. मात्र, या दुर्धर आजाराने त्याचे मनोबल खचले आणि त्याने ता. ८ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वॉर्डमधील लोखंडी अँगलला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला. 

तातडीने शहाजीला डॉक्टरांकडे उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नैराश्येतून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर भोईवाडा पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली. भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची अपमृत्यू म्हणून नोंद केली आहे.

कर्करोगाने ग्रासले असल्यामुळे शहाजीने आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 
                                                       -विनोद कांबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोईवाडा

 "