Thu, Dec 12, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्ड्यात दुचाकी आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू

खड्ड्यात दुचाकी आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू

Last Updated: Oct 11 2019 2:05AM
अंबाडी : वार्ताहर

भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार डॉ. नेहा शेख (वय 23) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री 10.45 वाजता हा अपघात झाला. डॉ. नेहा कुडूसच्या रहिवासी होत्या. भिवंडीतून स्वतःच्या लग्नाची खरेदी करून भावासोबत दुचाकीवरून त्या घरी परतत होत्या. अंबाडीजवळील दुगाड फाटा येथे मोठ्या खड्ड्यात त्यांची मोटारसायकल आदळून दोघे बहीण-भाऊ खाली पडले आणि तेवढ्यात मागून येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली डॉ. नेहा सापडल्या.   गेल्याच महिन्यात या रस्त्यावरील अंबाडी नाका येथे खड्ड्यात मोटारसायकल आदळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.

हा प्रकार समजताच श्रमजीवी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अनगाव टोल नाका रात्री 12 वाजता बंद केला. तर गुरुवारी सकाळी दुगाड फाटा येथे लोकांनी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. 
सुरुवातीपासून वादात असलेल्या सुप्रीम या कंपनीने सदर रस्ता अतिशय निकृष्ट बनवला आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. आता या कंपनीला शासनाने काळ्या यादीत टाकले असले तरी या कंपनीच्या कृपेने पडलेल्या खड्ड्यांत बळी जाणे मात्र सुरूच आहे.