Mon, Mar 08, 2021 17:57
मुंबईत खासगी वाहनांतून बिनधास्त फिरा विनामास्क 

Last Updated: Jan 18 2021 2:20AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना आटोक्यात आल्यानंतर मुंबईतील नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांतील प्रवाशांना विनामास्क कारवाईतून वगळण्याचा निर्णय मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मात्र, सार्वजनिक वाहनातील प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व उद्योगधंदे आणि व्यवसाय यानंतर ठप्प झाले. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. हात धुणे, गर्दी टाळणे आणि मास्क परिधान सक्तीचे केले. मुंबई शहरासह उपनगरात नो मास्क, नो एन्ट्री असे अभियान राबविण्यात आले. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना प्रवासास बंदी घातली. विनामास्क प्रवासी आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

सध्या कोरोना उतरणीला लागला आहे. लसीकरण मोहीमदेखील सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी खासगी वाहनांतील प्रवाशांना मास्क परिधान करणे सक्तीचे नाही. त्यामुळे पालिका प्रशासन आणि क्लीन-अप मार्शलने अशा वाहनातून विनामास्क प्रवास करणार्‍यांना दंड आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. लवकरच यासंदर्भातील परिपत्रक काढले जाईल. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो, लोकल आदी वाहनांतील प्रवाशांना मास्क परिधान करणे सक्तीचे आहे.

ओला, उबरबाबत संभ्रम

मोबाईल अ‍ॅपद्वारे ओला आणि उबर कंपन्या सेवा पुरवतात. त्या खासगी की सार्वजनिक सेवेत मोडतात, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अशा वाहनांतील प्रवाशांनी मास्क परिधान करावा की नाही, याचा निर्णय घेतलेला नाही. लवकरच आयुक्त चहल यावर तोडगा काढतील. मात्र, तोपर्यंत अशा वाहनांतील विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.