Wed, Aug 12, 2020 11:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजधानी दिल्लीत तब्बल २२ फुटबॉलची मैदाने सामावतील एवढे भव्य कोरोना केअर सेंटर!

राजधानी दिल्लीत तब्बल २२ फुटबॉलची मैदाने सामावतील एवढे भव्य कोरोना केअर सेंटर!

Last Updated: Jul 01 2020 3:21PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाप्रभावित राज्याच्या क्रमवारीत महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची असुविधा होवू नये यासाठी सर्वसोयींनी सुसज्ज असलेले भव्य सरदार पटेल कोरोना केअर सेंटर छतरपूर येथील राधा स्वामी सत्संग व्यास परिसरातील उभारण्यात आले आहे. 

फुटबॉलची २२ मैदाने सामावतील एवढ्या १२ लाख १५ हजार चौरस फूट परिसरात हे केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र जगातील सर्वात मोठे कोरोना केअर सेंटर असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच संयुक्तरित्या या सेंटरचा दौरा करत पाहणी केली होती. कोरोना केअर सेंटरची नोडल एजेन्सी म्हणून इंडो-तिबेटन सीमा पोलिसांची (आयटीबीपी) नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा : तामिळनाडू : पॉवर प्लांटमध्ये स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी

१० हजार २०० खाट क्षमता असलेल्या या केंद्रात जवळपास १ हजार डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वृंद कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी सुसज्जित ठेवण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या तसेच लक्षणे दिसून न येणाऱ्या रुग्णांना केंद्रातील वेगवेगळ्या भागात उपचार देण्यात येतील. जगातील कुठलेच कोरोना केअर सेंटर या केंद्रात एवढे मोठे नसून अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या संयुक्तरित्या हे रुग्णालय उभारले आहे.

अधिक वाचा :पेट्रोल- डिझेलनंतर आता गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवे दर!

२६ जून पासून पहिल्या टप्यात २ हजार खाटा असलेले सेंटर कार्यरत करण्यात आले आहे. हळूहळू कोरोना बाधितांना या सेंटरमध्ये दाखल केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राजधानी दिल्लीत आतापर्यत ८७ हजार ३६० कोरोनाबाधित आढळून आले आहे. यातील ५८ हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे, तर २६ हजार २७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिल्लीतील २ हजार ७४२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पंरतु, या कोरोना केअर सेंटरमुळे रुग्णांलयातील खाट संख्येचा अभाव पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

कार्डबोर्ड खाटांची व्यवस्था

केंद्रात कार्डबोर्ड ने बनवण्यात आलेले खाटा कोरोनाग्रस्तांना उपलब्ध होतील. रुग्णांचा उपयोगानंतर या खाटांना नष्ट करता येवू शकते. या खाटा पुर्णत: बायोडिग्रेडबल मटेरियल पासून बनवण्यात आल्या आहेत. जवळपास २२ किलोमीटर भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या मदतीने परिसरात वीज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

रुग्णांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने वीज व्यवस्थेसाठी भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. एकूण १० हजार खाटांपैकी १ हजार ऑक्सिजन खाटा आहेत. दिल्लीत असह्य उकाडा असल्याने सेंटरमध्ये हजारो पंखे लावण्यात आले आहे. शौचालयासाठी ५ हजार कमोडची व्यवस्था करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर केंद्राच्या एका भागात, तर दुसऱ्या भागात कोरोना आरोग्य देखभाल केंद्र असेल. 

श्रेयवादाची स्पर्धा!

राज्य सरकारकडून उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोरोना केअर सेंटरचे केंद्रीय गृहमंत्री चोरून-लपून उद्धाटन करीत आहेत, असा आरोप आप खासदार संजय सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. भाजप कोरोना विरोधात युद्ध लढत आहे की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात? असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला होता. भाजपकडून सिंह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यानंतर अमित शहा तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तरित्या या केंद्राचा दौरा केला होता. परंतु, कोरोना केअर सेंटरवरून दोन्ही पक्षांमध्ये श्रेय लाटण्याची चुरस सुरु झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले आहे.