Wed, May 27, 2020 03:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीईटीबरोबर विद्यापीठाच्याही परीक्षा होणारच

सीईटीबरोबर विद्यापीठाच्याही परीक्षा होणारच

Last Updated: Apr 07 2020 12:14AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. विद्यार्थी- पालकांनी याबाबत आपल्या मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये. सर्व विद्यापीठे आणि त्याअंतर्गत असणार्‍या महाविद्यालयीन परिक्षेसह सीईटीची परीक्षा होणारच आहेत. मात्र, या सर्व परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच होतील. या सर्व परीक्षांचे नियोजन व वेळापत्रक करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

राज्यातील सर्व 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत मंत्री सामंत यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन परिक्षांसह सीईटी परिक्षांबाबत आढावा घेतला. सामंत म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या रद्द होणार नाहीत.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतरच या परीक्षा घेतल्या जातील. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्याबाबत आमचा ’प्लॅन- बी’ तयार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी याबाबत मनात कोणताही संभ्रम बाळगण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व परिक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन, असा अहवाल तयार करतील. याबाबतची माहिती कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली जाईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितले. सर्व खासगी व अभिमत विद्यापीठांची व्हिडिओ कॉन्फरन्सही लवकरच घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.