Sat, Jul 04, 2020 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पीपीई किट घालून रमजानची नमाज अदा करू द्या'

'पीपीई किट घालून रमजानची नमाज अदा करू द्या'

Last Updated: May 22 2020 6:27PM

मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेखमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पीपीई किट घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून मुस्लिम बांधवांना रमजानची नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सुचना वारंवार दिल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ आणि सार्वजनिक सण साजरे केले जाऊ नयेत, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यातच येत्या २५ तारखेच्या दरम्यान रमजानची ईद असल्याने मुस्लिम बांधवांच्या नमाज अदा करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंघाने हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम समाजाने संपुर्ण सहकार्य देत आत्तापर्यंत शुक्रवारची नमाजही मशिदीत न जाता घरातूनच अदा केली आहे. मात्र जगभरात रमजान महिना पवित्र मानला जातो. घरोघरी राषणाई केली जाते आणि आनंदोत्सव साजरा केला जातो. त्यादिवशी मशिदीत जावून खुदबा पठण करून नंतर नमाज अदा करण्याची वेगळी पद्धत मुस्लिम मौलानाकडून शिकवण्यात येते. त्यानंतर नमाज अदा करून मित्र, नातेवाईक यांना कुटुंबियांकडून रमजानच्या शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही धर्मावर आणि देशावर सारखेच प्रेम करतो. त्यामुळे यावेळी नमाज अदा करण्याची परवाणगी द्यावी, असे हाजी अरफात शेख यांनी म्हटले आहे. 

ती अडचण वाटत असल्यास मुंबई शहरात आझाद मैदान, शिवाजी पार्क, महालक्ष्मी रेसकोर्स मैदान, सोमय्या मैदान, अशी मोठी मैदाने उपलब्ध आहेत, त्याठिकाणी नमाज अदा करण्यास परवानगी दिल्यास लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून नमाज अदा केली जाईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मैदानावर पीपीई कीटस् घालून नमाज अदा करण्याची आमची तयारी आहे. यंदाच्या वर्षी पठाणी सूट खरेदी करण्याऐवजी पीपीई सूट खरेदी करण्याची आमची तयारी आहे, कपड्यांपेक्षा नमाज महत्वाची आहे. अनेक मुस्लिम संस्था आणि संघटना त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत. महाराष्ट्रातील अनेक मौलवी, उलमा, पीरसाहेब यांचे सतत फोन येत आहेत आणि याबाबत विचारणा करत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तशी परवानगी द्यावी आणि राज्यातील ग्रीन झोनमध्ये मशिदीत जावून नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हाजी अरफात शेख यांनी या पत्राद्वारे केली आहे.