Sat, Dec 05, 2020 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांवरील पाणीपट्टी दरवाढ अखेर रोखली 

मुंबईकरांवरील पाणीपट्टी दरवाढ अखेर रोखली 

Last Updated: Oct 30 2020 1:58AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दरडोई 150 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरावर पालिकेने चारपट दर आकारण्याचा निर्णय घेतला होता. पण सर्वसामान्य मुंबईकरांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय गुरुवारी स्थायी समितीत रोखून धरण्यात आला. एवढेच नाही तर, प्रस्तावही फेटाळून लावत, मुंबईकरांना दरवाढीपासून दिलासा दिला आहे.

मुंबई राष्ट्रीय क्रमांकानुसार दरडोई 150 लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. याचा सरासरी एक हजार लिटरमागे 5 रुपये 22 पैसे इतका दर आहे. सध्या दरडोई 150 लिटरपेक्षा जास्त व 200 लिटरपर्यंत पाणी वापराचा दर दुप्पट म्हणजे 10 रुपये 44 पैसे इतका आहे. यात चौपट वाढ करून, हा दर 20 रुपये 88 पैसे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. दरडोई 250 लिटरपर्यंत पाणी वापरण्याचा सध्याचा दर तिप्पट म्हणजे 15 रुपये 66 पैसे इतका आहे. यात पाचपट वाढ करून हा दर 26 रुपये 10 पैसे करण्यात आला. तर दरडोई 250 लिटरपेक्षा जास्त पाणी वापर करण्याचा सध्याचा दर चारपट म्हणजे 20 रुपये 88 पैसे आहे. हा दर आता सहापट करत, 31 रुपये 32 पैसे करण्यात आला. 

 मानवतेच्या दृष्टिकोनातून दिल्या जाणार्‍या पाण्याचा दर सध्या दरडोई 10 रुपये 45 पैसे इतका आहे. यात कोणती वाढ सुचवण्यात आलेली नाही. पण 150 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरावर असलेला सध्याचा दुप्पट दर 20 रुपये 90 पैसे आहे. यात चार पटीने वाढ सुचवण्यात आली असून 41 रुपये 80 पैसे इतका दर आकारण्याचा निर्णय घेतला होता.

या दरवाढीचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आला असता भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे व भालचंद्र शिरसाट यांनी जोरदार आक्षेप घेतला. ही दरवाढ सामान्य मुंबईकरांची कंबर मोडणारी आहे. त्यामुळे ती तातडीने रद्द करावी, अशी आग्रही मागणी लावून धरली. याला विरोधी पक्षनेते रविराजा यांनी पाठिंबा देत ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. अखेर दरवाढीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव  समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मताला टाकला असता, सत्ताधारी शिवसेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे आता मुंबईत पूर्वीप्रमाणेच पाण्याचे दर आकारले जाणार आहेत.